वाहतुकीच्या शिस्तीचा बोजवारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 09:41 PM2017-11-26T21:41:24+5:302017-11-26T21:41:38+5:30
वाहतूक नियंत्रण शाखेने उशीरा का होईना शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. त्याची अंमलबजावणी देखील सुरू केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : वाहतूक नियंत्रण शाखेने उशीरा का होईना शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. त्याची अंमलबजावणी देखील सुरू केली. मात्र संबंधीत विभागाचे याकडे दुर्लक्ष झाल्याने तीन दिवसांतच शहरातील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे.
शहरातील गोरेलाल चौक, गांधी प्रतिमा, नेहरु चौक, चांदणी चौक आणि दुर्गा चौक या परिसरात बाजारपेठ असल्याने मार्गावर सतत वाहनांची वर्दळ असते. तसेच गोरेलाल चौककडूनच रेल्वे स्थानकाकडे ये-जा करणाºया प्रवाशांची वर्दळ असते. शहरातील मुख्य मार्गावर काहींनी अतिक्रमण केले आहे. परिणामी शहरातील रस्ते अरुंद झाले आहे. शहरातील वाहनांच्या संख्येत दरवर्षी मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. वाहनांची वाढती संख्या आणि अरुंद रस्ते यामुळे या चौकांमध्ये दर तासाला वाहतुकीची कोंडी होत असल्याचे चित्र बघायला मिळते.
परिणामी अपघातांच्या संख्येत सुद्धा वाढ झाली आहे. वाहतुकीच्या कोंडीमुळे अनेकदा वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागतो. शहरातील वाहतुकीची समस्या ही आजची नसून गेल्या सात-आठ वर्षांपासून आहे. पण यावर आजवर तोडगा काढण्यात आला नव्हता. मात्र नगर परिषद, जिल्हा प्रशासन आणि वाहतूक नियंत्रण शाखेने पंधरा दिवसांपूर्वी एकत्र येत शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी या प्रमुख मार्गांवर सकाळी १० ते रात्री ८ वेळेत जड आणि चारचाकी वाहनांना प्रवेशबंदी लागू केली. त्याची सूचना सुद्धा दवंडी देऊन दिली.
वाहतुकीच्या कोंडीवर तोडगा काढण्यासाठी वन वे पार्किंग आणि सम आणि विषमचा नागपुरचा प्रयोग राबविला. यामुळे गेले दोन दिवस शहरातील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा झाल्याचे चित्र होते. शहरवासीयांनीही हे चित्र असेच कायम राहिले तर वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागणार नसल्याने पोलीस विभागाच्या पुढाकाराचे कौतुक केले. मात्र तिसºयाच दिवशी शहरातील वाहतुकीची शिस्त पुन्हा बिघडल्याचे चित्र आहे. प्रवेशबंदी असलेल्या मार्गावरुन चारचाकी वाहने सर्रासपणे धावत आहे. त्यामुळे तीन दिवसांतच वाहतुकीचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे.
कठोर भूमिकेची गरज
वाहतुक नियंत्रण शाखेने बºयाच वर्षांनंतर शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पाऊल उचले आहे. ते कौतुकास्पद असले तरी जोपर्यंत वाहतुकीच्या नियमांचे उल्लघंन करणाºयांवर कारवाई करण्यासाठी कठोर पाऊल उचलत नाही. तोपर्यंत शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लागणे कठीण आहे.
सम-विषमचा प्रयोग फसला
शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी वाहतुक नियंत्रण शाखेतर्फे सम-विषमचा प्रयोग राबविण्यात आला. यातंर्गत आठवड्यातील काही दिवस एका बाजुला तर काही दिवस रस्त्याच्या दुसºया बाजुला पार्किंग करण्याचा प्रयोग राबविला. मात्र याचे देखील तिसºयाच दिवशी उल्लघंन केले जात आहे.
डझनभर वाहतूक नियंत्रण शिपायांची नियुक्ती
वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी आणि वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी चौकांचोकांत वाहतूक नियंत्रण शाखा व पोलीस ठाण्यांतील शिपायांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या डोळ्यात देखत रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी केली जात असताना आणि चारचाकी जात असताना त्यांच्यावर कुठलीच कारवाई केली जात नसल्याचे चित्र आहे.