एकाच्या नावाने दुकानगाळे, दुसऱ्यानेच थाटले दुकान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:19 AM2021-06-30T04:19:26+5:302021-06-30T04:19:26+5:30
अमरचंद ठवरे बोंडगावदेवी : पंचायत समिती अर्जुनी-मोरगावच्या मूलभूत सुविधाअंतर्गत स्वर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजनेमध्ये जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणामार्फत ...
अमरचंद ठवरे
बोंडगावदेवी : पंचायत समिती अर्जुनी-मोरगावच्या मूलभूत सुविधाअंतर्गत स्वर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजनेमध्ये जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणामार्फत उपलब्ध निधीतून पंचायत समिती आवारात ८ दुकान गाळ्यांचे बांधकाम करण्यात आले. २०१७ मध्ये महिला बचत गट, तसेच स्वयंरोजगार करणाऱ्यांना २१ अटी, शर्तीच्या अधिन राहून भाडेतत्त्वावर ११ महिन्यांच्या कालावधीसाठी हे गाळे देण्यात आले. ज्यांच्या नावाने भाडेतत्त्वावर दुकानगाळे देण्यात आले त्यांनी त्याठिकाणी स्वत: दुकान न थाटता परस्पर आपले आर्थिक हित जोपासत दुसऱ्यालाच दुकान थाटण्याची परवानगी दिली आहे.
महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांचा सर्वांगीण विकास व्हावा, त्यांना स्वयंरोजगाराची संधी मिळून कुटुंबाला हातभार लागावा, सुशिक्षित बेरोजगारांना स्वयंरोजगार करण्याच्या दृष्टीने मोक्याच्या ठिकाणी दुकानगाळे उपलब्ध करुन देण्यात आले. ज्यांच्या नावाने दुकानगाळे वाटप करण्यात आले. अशा महाभागाचे दुकान त्या ठिकाणी थाटलेले न दिसता दुसरेच व्यक्ती रोजगार करीत असल्याचा प्रकार पुढे आला आहे. बचत गटाच्या नावाने दुकानगाळे जरी मंजूर झाले असले तरी स्वयंघोषित पदाधिकारी त्या गाळ्यावर आपले स्वामित्त्व दाखवून परस्पर इतरांकडून मोठी रक्कम घेऊन दुसऱ्यांना भाड्याने दिल्याचे बोलले जाते. यामुळे अटी व शर्तीचा भंग करून शासनाची दिशाभूल करणाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी जागरूक नागरिकांनी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रारीद्वारे केली आहे.
.......
यांना केले दुकानगाळ्यांचे वाटप
तालुक्यातून सर्व ग्रामपंचायत, नगर पंचायत कार्यक्षेत्रातील महिला बचत गट, स्वयंरोजगार करणाऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले. पंचायत समितीच्या मासिक सभेत इंदिरा महिला स्वयंसहाय्यता बचत गट अर्जुनी मोरगाव थंडपेय व दुकान रसिका निलकंठ ढोरे, इटखेडा, डेअरी व्यवसाय नारायणसिंह विठ्ठलसिंह बघेल, महागाव, हॉटेल व्यवसाय जगदीश मारोती कांबळे, ताडगाव, चहापान नाश्ता जय गायत्री माता स्वयंसहायता बचत गट इटखेडा, किराणा दुकान रेखा शिवकुमार मंडळ, दिनकरनगर स्वेटर, कापड विक्री दुकान, दिवाकर विनायक शहारे अर्जुनी मोरगाव, फळ व्यवसाय प्रज्ञा स्वयंसहायता महिला बचत गट अर्जुनी मोरगाव-मिरची व मसाले उद्योग यांना अटी व शर्तीच्या अधीन राहून भाडेतत्त्वावर दुकानगाळे जिल्हा परिषदेने ठरवून दिलेल्या दरमहा ८२० रुपयेप्रमाणे व दरवर्षी १० टक्के वाढ करण्याच्या अटीवर मंजूर करण्यात आले होते. मात्र, ज्यांना गाळे वाटप करण्यात आले तेच याचा वापर करीत नसल्याची बाब पुढे आली आहे.
..........
मौका पंचनाम्यात बाब स्पष्ट
तक्रारीच्या अनुषंगाने पंचायत समितीच्यावतीने ९ फेब्रुवारी २०२१ रोजी प्रत्यक्ष मौकास्थळी जाऊन पंचनामा करण्यात आला. तेव्हा खरी परिस्थिती दिसून आली. ज्यांना गाळे वाटप केले ते त्याचा वापर करीत नसून दुसऱ्याला भाडेतत्त्वावर दिल्याचा प्रकार मोका चौकशीदरम्यान आढळून आला. मात्र, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर अद्यापही कारवाई करण्यात आली नाही.