एसटीच्या रातराणीला अल्प प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:38 AM2021-06-16T04:38:26+5:302021-06-16T04:38:26+5:30
गोंदिया : सुरक्षित व भरवशाचा प्रवास म्हणून नागरिकांचा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळावर दृढ विश्वास आहे. यामुळेच रेल्वेनंतर एसटीच्या लालपरीलाच ...
गोंदिया : सुरक्षित व भरवशाचा प्रवास म्हणून नागरिकांचा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळावर दृढ विश्वास आहे. यामुळेच रेल्वेनंतर एसटीच्या लालपरीलाच नागरिक प्रवासासाठी प्राथमिकता देतात. एसटीच्या या प्रवासात लालपरी व शिवशाही प्रवाशांच्या सेवेत सज्ज असतानाच रातराणीसुद्धा प्रवासी सेवेत असते. विभागात फक्त गोंदिया आगाराला १ रातराणी देण्यात आली आहे, ही अभिमानाची बाब आहे. आगाराची ही रातराणी सोमवारपासून (दि.१४) प्रवाशांच्या सेवेत पुन्हा रस्त्यावर उतरली आहे. गोंदिया ते नांदेड धावणारी ही रातराणी नागपूर मार्गे धावत असल्याने या गाडीला नागपूरपर्यंत प्रतिसाद मिळतो. दररोज दुपारी २.३०ला ही गाडी सुटत असून, अल्प प्रतिसाद असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, नागपूरपर्यंत प्रवासी असतात; मात्र त्यानंतर पुढे व थेट नांदेडपर्यंत प्रवाशांची संख्या मोजकीच असते. म्हणूनच विभागात एकमेव असलेल्या या रातराणीलाही प्रवाशांचा अल्प प्रतिसाद दिसून येत आहे.
----------------------------
जिल्ह्यात सध्या एसटीच्या किती फेऱ्या सुरू आहेत- १२५
रातराणी किती- १
वाहक-२
चालक-२
-----------------------------
नागपूर मार्गावर धावते रातराणी
विभागात गोंदिया आगारालाच १ रातराणी देण्यात आली आहे. ती गाडी नागपूरमार्गे नांदेडपर्यंत धावते. गोंदिया ते नागपूर मार्ग हा अत्यंत वर्दळीचा मार्ग असून, या मार्गासाठी रेल्वे व बसेसच्या दिवसभर फेऱ्या आहेत. शिक्षण, उपचार, खरेदी, शासकीय कामकाजाशिवाय अपडाऊन करणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने नागपूर मार्गावर रेल्वे व एसटीलाही चांगला प्रतिसाद आहे. दिवसभर गाड्यांची सोय असल्याने आरक्षणाची गरज पडत नाही, हे विशेष.
--------------------------------------
बालाघाट मार्गावर ट्रॅव्हल्सचा डल्ला
गोंदिया जिल्हा हावडा-मुुंबई रेल्वे मार्गावर असल्याने येथून रेल्वे व बसेसच्या दिवसभर फेऱ्या उपलब्ध आहेत. परिणामी, नागरिकांना खासगी ट्रॅव्हल्सने प्रवास करण्याची गरज पडत नाही; मात्र लगतच्या मध्यप्रदेश राज्यातील बालाघाट येथे प्रवासासाठी एसटीच्या फेऱ्या कमी असून, खासगी ट्रॅव्हल्सने या मार्गावर डल्ला मारला आहे. खासगी ट्रॅव्हल्सच्या बसेस येथून सतत धावत असल्याने बालाघाट मार्गावर एसटीला फटका बसत आहे. याशिवाय मात्र एसटी व रेल्वेच्या दिवसभर गाड्या असल्याने खासगी ट्रॅव्हल्स तेथे मधात पडत नाहीत.
---------------------------------
अवघ्या विभागात फक्त गोंदिया आगारालाच १ रातराणी देण्यात आली आहे. ही गाडी नांदेडपर्यंत धावत असून, नागपूरमार्गे जात असल्याने नागपूरपर्यंत काही प्रवासी असतात. जिल्ह्यातील नागपूर मार्ग सर्वाधिक वर्दळीचा मार्ग असून, आगाराच्याही दिवसभर फेऱ्या आहेत. त्यामुळे रातराणीला अल्प प्रतिसाद असतो; मात्र प्रवाशांच्या सुविधेसाठी रातराणी नेहमी सज्ज आहे.
- संजना पटले
आगारप्रमुख, गोंदिया.