एसटीच्या रातराणीला अल्प प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:18 AM2021-07-12T04:18:53+5:302021-07-12T04:18:53+5:30
गोंदिया : सुरक्षित व भरवशाचा प्रवास म्हणून नागरिकांचा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळावर दृढ विश्वास आहे. यामुळेच रेल्वेनंतर एसटीच्या ...
गोंदिया : सुरक्षित व भरवशाचा प्रवास म्हणून नागरिकांचा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळावर दृढ विश्वास आहे. यामुळेच रेल्वेनंतर एसटीच्या लालपरीलाच नागरिक प्रवासासाठी प्राथमिकता देतात. एसटीच्या या प्रवासात लालपरी व शिवशाही प्रवाशांच्या सेवेत सज्ज असतानाच रातराणीसुद्धा प्रवासी सेवेत असते. विभागात फक्त गोंदिया आगाराला १ रातराणी देण्यात आली आहे. ही अभिमानाची बाब आहे. आगाराची ही रातराणी १४ जूनपासून प्रवाशांच्या सेवेत पुन्हा रस्त्यावर उतरली. मात्र, गोंदिया ते नांदेड धावणारी ही रातराणी नागपूरमार्गे धावत असून, प्रवाशांचा प्रतिसाद नसल्याने आता यवतमाळपर्यंत जात आहे. दररोज दुपारी २.३० वाजता ही गाडी सुटते. विशेष म्हणजे, नागपूरपर्यंत प्रवासी असतात. मात्र, त्यानंतर पुढे व थेट नांदेडपर्यंत प्रवाशांची संख्या मोजकीच असते. म्हणूनच विभागात एकमेव असलेल्या या रातराणीलाही प्रवाशांचा अल्प प्रतिसाद दिसून येत आहे.
-----------------------------
विभागातच स्लीपर नाही
विभागात गोंदिया आगाराला फक्त १ रातराणी देण्यात आली आहे, तर ४ शिवशाही देण्यात आल्या असून, यासुद्धा नागपूरपर्यंत धावतात. विशेष म्हणजे, विभागातच स्लीपर गाड्या नाहीत. मात्र, एसटीचा प्रवास सुरक्षित असून, त्यात शिवशाहीचा प्रवास आरामदायक आहे. शिवाय, दिवसभर बसेस व रेल्वे गाड्याही असल्याने नागरिकांना खासगी ट्रॅव्हल्सने महागडा प्रवास करण्याची गरजच पडत नाही.
--------------------
फक्त बालाघाट मार्गावरच खासगी बसेस
जिल्ह्यात नागपूर मार्ग हा सर्वाधिक वर्दळीचा व उत्पन्नाचा मार्ग समजला जातो. ही बाब गोंदिया व तिरोडा आगारासाठीही लागू पडते. यामुळेच या मार्गावर दिवसभर गाड्यांची सोय करण्यात आली आहे. फक्त शेजारच्या मध्यप्रदेश राज्यातील बालाघाटसाठी खासगी बसेस धावतात. मात्र, मध्यप्रदेश शासनाच्या आदेशानंतर आता त्यांचाही प्रवेश बंद आहे. यामुळेच जिल्ह्यातून नागपूर मार्गावर खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांसाठी वावच नाही.
------------------------------------