वाहकांच्या कमतरतेमुळे उन्हाळी हंगामाचे नियोजन लांबले
By admin | Published: March 4, 2017 12:10 AM2017-03-04T00:10:31+5:302017-03-04T00:10:31+5:30
सुरक्षित प्रवासाचे ब्रीद घेऊन धावणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस संचालित करण्यासाठी गोंदिया व तिरोडा आगारात चालक-वाहकांची कमतरता आहे.
गोंदिया व तिरोडा आगार : शाळा बंद झाल्यावर अतिरिक्त बसेस सुरू होणार
गोंदिया : सुरक्षित प्रवासाचे ब्रीद घेऊन धावणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस संचालित करण्यासाठी गोंदिया व तिरोडा आगारात चालक-वाहकांची कमतरता आहे. त्यामुळे दोन्ही आगारांचे उन्हाळी नियोजन लांबणीवर गेल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
दिवाळी व उन्हाळ्याच्या सुट्या तथा लग्नसराई यामुळे एसटीच्या प्रवासाला या दिवसांत चांगलाच प्रतिसाद मिळतो. याच कालावधीत आगारांचे उत्पन्नसुद्धा अधिक होते. अन्यथा आगारांना अधिक उत्पन्नाची मजल गाठणे कठिण जाते. उन्हाळ्यात बाहेरगावी जाणाऱ्या व बाहेरगावावरून येणाऱ्या प्रवाशांकडून एसटी प्रवासाला चांगली पसंती मिळत असल्याचे मागील अनेक वर्षांच्या आकडेवारीवरून दिसून येते.
परंतु यंदा गोंदिया व तिरोडा आगारात चालक-वाहकांची पदे रिक्त असल्याने उन्हाळी नियोजन लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शाळा बंद झाल्यावर मानव विकास कार्यक्रमांतर्गत धावणाऱ्या स्कूल बसेस व त्यांचे चालक-वाहक उपलब्ध होऊ शकतील. तेव्हाच १० ते १५ एप्रिलदरम्यान उन्हाळी हंगामासाठी अतिरिक्त बसफेऱ्या सोडल्या जातील, अशी माहिती संबंधित सूत्रांनी दिली आहे.
गोंदिया आगारात एकूण ९० बसेस आहेत. त्यापैकी २८ बसेस मानव विकास कार्यक्रमाच्या असून त्या ‘स्कूल बसेस’ म्हणून धावतात. तर चालकांची १५५ व वाहकांची १५५ पदे मंजूर आहेत. मात्र प्रत्यक्ष चालक १३७ व वाहकही १३७ आहेत. त्यातच दोन वाहकांचे बदली आदेश आल्याने आता गोंदिया आगारात केवळ १३५ वाहक राहणार आहेत. मात्र सहा कर्मचारी असे आहेत जे चालक व वाहक या दोन्ही पदावरील काम सांभाळतात. शिवाय मागील अनेक वर्षांपासून वाहतूक अधिकाऱ्यांचे पद रिक्त असून तो प्रभार भंडारा जिल्ह्यातील वाहतूक अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आला आहे. तर तिरोडा आगारात एकूण बसेस ४८ असून यापैकी ७ मानव विकास कार्यक्रमाच्या स्कूल बसेस आहेत. येथे ७६ चालक कार्यरत आहेत. त्या तुलनेत वाहकांची सात पदे रिक्त असल्याने ६९ पदे कार्यरत आहेत.
या प्रकारामुळे त्यांना ओव्हरटाईम करावा लागतो. प्रसंगी वाहकाची प्रकृती अस्वस्थ असली किंवा त्याने ओव्हरटाईम करण्यास नकार दिला तर मात्र फेरी रद्द करण्याची पाळी येते. चालक-वाहकांच्या पदांच्या कमतरतेचा परिणाम उन्हाळी हंगामाच्या नियोजनावर पडला असून ते लांबल्याचे समजते.(प्रतिनिधी)
ग्रामीण भागात फेऱ्या वाढविण्यावर भर
राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ कार्यालयाकडून लांब पल्ल्यांच्या बसेस सुरू करण्यापेक्षा ग्रामीण भागात फेऱ्या वाढविण्यात याव्या, असे आदेश आगारांना देण्यात आले आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर लांब पल्ल्यांच्या बसेस सुरू करण्याऐवजी ग्रामीण भागात फेऱ्या वाढविण्यावर भर दिला जात आहे. मात्र उन्हाळी हंगाम बघता गोंदिया आगारातून १ एप्रिलपासून एक किंवा दोन बसफेऱ्या सुरू करण्यात येतील, असे संबंधितांनी सांगितले आहे.