महिनाभरापासून बारदान्याचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:31 AM2021-02-11T04:31:05+5:302021-02-11T04:31:05+5:30
गोठणगाव : येथील आदिवासी विविध सेवा सहकारी संस्थेमध्ये धान खरेदी केंद्र सुरू होते; परंतु महिनाभरापासून बारदाना नसल्याने व धान ...
गोठणगाव : येथील आदिवासी विविध सेवा सहकारी संस्थेमध्ये धान खरेदी केंद्र सुरू होते; परंतु महिनाभरापासून बारदाना नसल्याने व धान खरेदीसाठी जागा नसल्याने धान खरेदी बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी झाली असून, त्यांना गरजेपाेटी खासगी व्यापाऱ्यांना धानाची विक्री करावी लागत आहे.
आदिवासी विकास महामंडळ उपविभाग नवेगावबांध अंतर्गत आदिवासी सेवा सहकारी संस्था येथे आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. महिनाभरापासूृन केंद्रावर बारदाना नसल्याने शेतकऱ्यांनी स्वत:च्या बारदान्यामध्ये धानाची विक्री केली. संस्थेच्या मालकीची तीन गोदामे आहेत. मात्र, ही तिन्ही गोदामे आता पूर्ण क्षमतेने भरली आहेत. तरी संस्थेने शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन उघड्यावर धान खरेदी केली. मात्र, आता शेतकऱ्यांकडून खरेदी केलेले धान ठेवण्यासाठी जागा नसल्याने संस्थेने धान खरेदी बंद केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. सध्या सर्वच धान खरेदी केंद्रांवर मोठ्या प्रमाणात धानाची आवक वाढली आहे. मात्र, राईस मिलर्सने भरडाईसाठी शासकीय धानाची उचल करणे बंद केले आहे. त्यामुळे धान खरेदी केंद्रावर धानाचा खच पडला आहे. महिनाभरापासून राईस मिलर्सचे आंदोलन सुरू असून, याची अद्यापही शासन आणि प्रशासनाने दखल घेतली नसल्याने समस्या कायम आहे. मात्र, यावर त्वरित तोडगा न निघाल्यास धान खरेदीची प्रक्रिया ठप्प पडून शेतकऱ्यांवर कमी दरात खासगी व्यापाऱ्यांना धान विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे याकडे लक्ष देऊन ही समस्या मार्गी लावण्याची मागणी केली जात आहे.
.......
शेतकरी पुन्हा व्यापाऱ्यांच्या दारात
यंदा शासनाने धानाला १८६८ रुपये हमीभाव आणि ७०० रुपये प्रतिक्विंटल बोनस जाहीर केला आहे. त्यामुळे शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, बऱ्याच धान खरेदी केंद्रांवर बारदान्याचा तुटवडा आहे, तर काही केंद्रांवर धान ठेवण्याची अडचण निर्माण झाल्याने धान खरेदी बंद करण्यात आली आहे. परिणामी शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांना कमी दरात धानाची विक्री करावी लागत आहे.