हेल्मेटचा तुटवडा, सक्ती तीन दिवस लांबणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 09:38 PM2018-10-15T21:38:15+5:302018-10-15T21:39:28+5:30
जिल्ह्यात दरवर्षी दीडशे लोक रस्ता अपघातात मृत्यू पावतात. त्यापैकी सरासरी १०० व्यक्ती मोटारसायकल चालक असतात. रस्ता अपघातात डोक्याला मार लागल्याने गंभीर दुखापत होते. जखमी व्यक्तींचा अवकाळी मृत्यू होतो. वाहन चालक प्राणास मुकू नयेत, यासाठी मोटारसायकल चालकांना हेल्मेट वापरणे १५ आॅक्टोबरपासून सक्तीचे करण्यात आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात दरवर्षी दीडशे लोक रस्ता अपघातात मृत्यू पावतात. त्यापैकी सरासरी १०० व्यक्ती मोटारसायकल चालक असतात. रस्ता अपघातात डोक्याला मार लागल्याने गंभीर दुखापत होते. जखमी व्यक्तींचा अवकाळी मृत्यू होतो. वाहन चालक प्राणास मुकू नयेत, यासाठी मोटारसायकल चालकांना हेल्मेट वापरणे १५ आॅक्टोबरपासून सक्तीचे करण्यात आले होते.
परंतु गोंदियाच्या बाजारात हेल्मेटचा तुटवडा असल्याने हेल्मेट सक्ती तीन दिवस उशीरापासून करण्यात येणार आहे. अपघातात व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबातील पत्नी, मुले, वडील, आई यांच्यावर आर्थिक, शारीरिक व मानसिक संकट येते.
दरवर्षी रस्ता अपघातात सामान्य जनतेसह जिल्ह्यातील पोलीस कर्मचारी मृत्यू पावतात.अपघातात मृत्यू पावणाऱ्यांमध्ये जास्तीत जास्त दुचाकी चालक असतात.
त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर संकट कोसळते. हीच बाब लक्षात घेवून जिल्ह्यातील सर्व पोलीस कर्मचारी यांना हेल्मेट वापरण्याची सक्ती महिनाभरापूर्वीपासून करण्यात आली आहे.
त्यामुळे गोंदिया जिल्हा पोलीस दलातील पोलिसांनी हेल्मेट न वापरल्यामुळे १५ पोलिसांना दंड करण्यात आला. ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी वाहन चालविताना हेल्मेटचा वापर केलेला नाही. अश्या पोलीस कर्मचाºयांवर मोटार वाहन कायदा कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
गोंदिया जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना हेल्मेटची सवय लागावी, यासंदर्भात १३ सप्टेंबरला विशेष मोहीम राबविण्यात आली.
यात गोंदिया शहरात राबविलेल्या मोहीमेत ९ पोलीस कर्मचारी वाहन चालविताना हेल्मेट वापरलेले नव्हते. त्यामुळे त्यांच्यावर मोटार वाहन कायद्यान्वये प्रत्येक व्यक्तीवर ५०० रूपये प्रमाणे ४५०० रूपये तडजोड शुल्क त्यांच्याकडून वसूल करण्यात आला. आता सर्वसामान्य वाहन चालकांना व त्या वाहनावर मागे बसलेल्या लोकांनाही हेल्मेटचा वापर न केल्यास त्यांच्यावरही मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार आहे.
पोलीस अधिक्षकांनी हेल्मेट सक्ती सुरू केल्यानंतर लोकांची हेल्मेट घेण्यासाठी तारांबळ उडाली. परंतु गोंदियाच्या बाजारात पाहिजे तेवढे हेल्मेट उपलब्ध नसल्यामुळे हेल्मेट सक्ती तीन दिवस पुढे ढकलण्यात आली असल्याचे पोलीस अधिक्षकांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रातून म्हटले आहे.
हेल्मेट जागृतीसाठी मोटारसायकल रॅली
गोंदिया शहरातील नागरिकांना हेल्मेट संदर्भात जागृती करण्यासाठी १६ आॅक्टोबरला सकाळी ११ वाजता जिल्हा वाहतूक पोलिसांकडून हेल्मेटवर जनजागृती करण्यासाठी मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे. मनोहर चौक गोंदिया येथून रॅली काढण्यात येणार आहे. रॅली मुख्य बाजारपेठ, रामनगर सिव्हील लाईन येथे काढण्यात येणार आहे. या रॅलीत हेल्मेट धारण करणाºया वाहन चालकांनी सहभागी व्हावे,असे पोलीस अधीक्षक हरिष बैजल यांनी कळविले आहे.