शॉटसर्किटने घराला लागली आग
By admin | Published: July 2, 2017 12:23 AM2017-07-02T00:23:06+5:302017-07-02T00:23:06+5:30
एकाच घरात राहत असलेले बेनीराम अंबुले, घनश्यम बेनीराम अंबुले व यशवंत बेनीराम अंबुले यांच्या घराला
सुमारे पाच लाखांचे नुकसान : परिवार आले उघड्यावर
लोकमत न्यूज नेटवर्क
परसवाडा : एकाच घरात राहत असलेले बेनीराम अंबुले, घनश्यम बेनीराम अंबुले व यशवंत बेनीराम अंबुले यांच्या घराला शॉट सर्कीटने सकाळी ७.३० वाजता आग लागली. या आगीत तिन्ही घरातील सामानाची नासधूस झाली असून यात सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले आहे. ऐन पावसाळ््यात घराला आग लागल्याने अंबुले परिवार उघड्यावर आले आहे.
शॉट सर्कीटने अचानक सकाळी आग लागल्याने अंबुले परिवारची धावपळ सुरू होती. आग लागल्याची बाब लक्षात येताच गावकऱ्यांनीही मदतीसाठी धाव घेतली व अदानी पावर प्लांटच्या अग्नीशमनला बोलाविले. मात्र तोवर घरातील सामानाची नासधूस झाली होती. त्यात घराच्या छतावर जनावरांसाठी तणस ठेवले होते व आगीने तेही जळून खाक झाले.
या आगीमुळे अंबुले परिवार उघड्यावर आले असून यात त्यांचे सुमारे पाच लाख रूपयांचे नुकसान झाल्याची नोंद तलाठी स्मिता बारसे यांनी पंचनाम्यात केली. घटनेची माहिती मिळताच दवनीवाडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार डब्ल्यू.एच.हेमणे, सरपंच सुलक्ष्मी शामकुवर, उपसरपंच मनीराम हिंगे, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष मुकेश भगत यांनीही आग विझविण्यासाठी सहकार्य केले.