स्वच्छता निरीक्षकांना कारणे दाखवा नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 06:00 AM2020-03-18T06:00:00+5:302020-03-18T06:00:30+5:30
राज्यात प्लास्टिक बंदी असतानाही बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या व अन्य साहित्यांचा सर्रास वापर सुरू आहे. प्लास्टिकचे मानव व पशुंच्या आरोग्यावरील दुष्परिणाम तसेच पर्यावरणासाठीही किती घातक ठरत आहे, याची प्रचिती आता येऊ लागली आहे. हे सर्व थांबविण्यासाठी प्लास्टिक वस्तूंचा वापर पूर्णपणे बंद करणेचे आहे. ही बाब गांभीर्याने घेत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्लास्टिक बंदीसाठी कंबर कसली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : राज्य शासनाने येत्या १ मे पर्यंत राज्याला सिंगल यूज प्लास्टिक मुक्त करण्याची संकल्पना मांडली आहे. त्यानुसार, सर्वच महानगर पालिका, नगर पालिका व नगर पंचायतींना दिशानिर्देश देण्यात आले आहेत. मात्र गोंदिया नगर परिषदेकडून पाहिजे त्या प्रमाणात कार्य होत नसल्याचे लक्षात घेत मुख्याधिकारी चंदन पाटील यांनी स्वच्छता निरीक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावून जाब विचारला आहे.
राज्यात प्लास्टिक बंदी असतानाही बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या व अन्य साहित्यांचा सर्रास वापर सुरू आहे. प्लास्टिकचे मानव व पशुंच्या आरोग्यावरील दुष्परिणाम तसेच पर्यावरणासाठीही किती घातक ठरत आहे, याची प्रचिती आता येऊ लागली आहे. हे सर्व थांबविण्यासाठी प्लास्टिक वस्तूंचा वापर पूर्णपणे बंद करणेचे आहे. ही बाब गांभीर्याने घेत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्लास्टिक बंदीसाठी कंबर कसली आहे. यातूनच त्यांनी येत्या १ मे पर्यंत सिंगल यूज प्लास्टिक मुक्तची संकल्पना मांडली आहे. त्यानुसार, राज्यातील सर्व महानगर पालिका, नगर पालिका, नगर पंचायतींना आपापले शहर सिंगल यूज प्लास्टिक मुक्त करण्यासाठी तारीख निहाय कार्य करण्यासाठी दिशानिर्देश दिले आहेत. विशेष म्हणजे, आता या विषयाला घेऊन सुमारे महिनाभरापूर्वी संबंधितांना पत्र पाठविण्यात आले आहेत. त्यानंतरही गोंदिया नगर परिषदेने अपेक्षेच्या तुलनेत काहीच कार्य केले नसल्याचे दिसत आहे. ही बाब जाणून मुख्याधिकारी पाटील यांनी स्वच्छता विभागातील स्वच्छता निरीक्षकांना मंगळवारी (दि.१७) कारणे दाखवा नोटीस बजावले आहे. तसेच २४ तासांच्या आत त्यावर जाब विचारला आहे.
कंत्राटी कर्मचारीही वांद्यात
नगर परिषदेत स्थायी तत्वावर कार्यरत स्वच्छता निरीक्षक असताना काही कंत्राटी तत्वावर स्वच्छता निरीक्षक घेण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, त्यांनाही नोटीस बजावण्यात आले आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांनी स्थायी कर्मचाऱ्यांच्या अधिनस्थ काम करावे लागत असताना मात्र त्यांनाही नोटीस देण्यात आल्याने स्वच्छता विभागात चांगलीच खळबळ माजली आहे.