डीन, सीएस, अधीक्षकांना कारणे दाखवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2018 12:04 AM2018-07-08T00:04:24+5:302018-07-08T00:05:55+5:30

येथील बाई गंगाबाई रुग्णालयातील (बीजीडब्ल्यू) वार्डात पाणी साचल्याच्या घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गांर्भियाने दखल घेतली. यावरुन जिल्हा प्रशासनाला फटकारल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी अधिकाऱ्यांची बैठक बोलावून त्यांना चांगलेच धारेवर धरले.

Show reasons for Dean, CS, Superintendent | डीन, सीएस, अधीक्षकांना कारणे दाखवा

डीन, सीएस, अधीक्षकांना कारणे दाखवा

Next
ठळक मुद्देबीजीडब्ल्यू रुग्णालय प्रकरण : यंत्रणा लागली कामाला

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : येथील बाई गंगाबाई रुग्णालयातील (बीजीडब्ल्यू) वार्डात पाणी साचल्याच्या घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गांर्भियाने दखल घेतली. यावरुन जिल्हा प्रशासनाला फटकारल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी अधिकाऱ्यांची बैठक बोलावून त्यांना चांगलेच धारेवर धरले. याप्रकरणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, जिल्हा शल्यचिकित्सक आणि बाई गंगाबाई रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक यांना शुक्रवारी (दि.६) सायंकाळी कारणे दाखवा नोटीस बजावली. त्यामुळे आरोग्य प्रशासनात खळबळ उडाली आहे.
शहरात गुरूवारी दोन तास बरसलेल्या पावसामुळे रस्ते जलमय झाले. तर सिव्हिल लाईन परिसरातील बीजीडब्ल्यू रुग्णालयाच्या महिला वार्डात गुडघाभर पाणी साचले. यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचे हाल झाले.
या सर्व प्रकारामुळे आरोग्य प्रशासन आणि जिल्हा प्रशासनावर मोठ्या प्रमाणात टिका झाली. यासर्व प्रकाराची मुख्यमंत्र्यांनी दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांना गुरूवारी (दि.६) दुपारी २ वाजेपर्यंत अहवाल मागविला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी बलकवडे यांनी आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेवून त्यांना चांगलेच धारेवर धरले.
त्यानंतर सायंकाळी बीजीडब्ल्यू रुग्णालयाला भेट देवून वास्तविक परिस्थितीचा आढावा घेतला. यासर्व प्रकाराची चौकशी करण्यासाठी जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी एम.राजा.दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत केली. या समितीने सुध्दा बीजीडब्ल्यू रुग्णालयाला भेट देवून तेथील सोयी सुविधांचा आढावा घेतला.
जिल्हाधिकारी बलकवडे यांनी बीजीडब्ल्यू रुग्णालयातील समस्यांकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, जिल्हा शल्यचिकित्सक व बीजीडब्ल्यू प्रभारी वैद्यकीय अधीक्षक यांना कारणे दाखवा नोटीस बजावून यासर्व बाबींवर खुलासा मागविला आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासनात खळबळ उडाली आहे.
डॉक्टरांच्या रिक्तपदांकडे दुर्लक्ष
जिल्ह्यातील एकमेव महिला व बाल रुग्णालय म्हणून बीजीडब्ल्यू रुग्णालय ओळखले जाते. मात्र या रुग्णालयात डॉक्टरांची १५ पदे तर इतर आरोग्य कर्मचाºयांची ५० टक्के पदे रिक्त आहेत. याबाबत अनेकदा शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. मात्र अद्यापही ही रिक्त पदे भरण्यात आली नाही. त्यामुळे रुग्णांना योग्य उपचार मिळण्यापासून वंचित राहावे लागत आहे.
पंधरा वर्षांपासून समस्या
सिव्हिल लाईन परिसरात बीजीडब्ल्यू रुग्णालयाची इमारत आहे. ही इमारत फार जुनी झाली आहे. या इमारती समोरील रस्ते उंच करण्यात आले. तर त्या तुलनेत इमारतीची उंची वाढविण्यात आली नाही. सखल भागामुळे रस्त्यांवरील संपूर्ण पाणी रुग्णालयाच्या आवारात आणि इमारतीत शिरते. ही समस्या आजची नसून मागील पंधरा वर्षांपासून आहे. यावर तोडगा काढण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने नगर परिषद, सार्वजनिक बांधकाअम विभाग आणि शासनाकडे सुध्दा पाठपुरावा केला. मात्र त्यांनी यावर कुठलाच तोडगा काढला नाही.
इमारत पाडणे हाच पर्याय
बीजीडब्ल्यू रुग्णालयाची जुनी इमारत जीर्ण झाली आहे. ही इमारत सखल भागात असल्याने जोराचा पाऊस झाल्यास रुग्णालयाच्या वार्डात पाणी साचते. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी जूनीे इमारत पाडून इमारतीची उंची वाढविणे हाच एकमेव पर्याय असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. तसेच तसा अहवाल सुध्दा सोपविल्याची माहिती आहे.
पत्रव्यवहाराची मागविली कागदपत्रे
बीजीडब्ल्यू रुग्णालयाच्या जुन्या इमारती संदर्भात मागील चार वर्षात रुग्णालय प्रशासनाने कोणता पाठपुरावा केला. पत्रव्यवहाराच्या सर्व प्रती, नगर परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाने यावर कोणत्या उपाय योजना केल्या. यासर्व गोष्टींची कागदपत्रे सोमवारपर्यंत सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी बलकवडे यांनी दिले आहे.

Web Title: Show reasons for Dean, CS, Superintendent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.