बरसल्या पावसाच्या सरी, वाढली हुडहुडी; किमान तापमान १५.३ अंशावर, मंगळवारीही जिल्ह्याला यलो अलर्ट
By कपिल केकत | Published: November 27, 2023 07:56 PM2023-11-27T19:56:28+5:302023-11-27T19:57:10+5:30
अशात पावसाने हजेरी लावल्यास जिल्ह्यात थंडीचा जोर आणखी वाढणार आहे.
गोंदिया : हवामान खात्याने ठरविलेला अंदाज अगदी तंतोतंत बसला असून, सोमवारी (दि. २७) सकाळी ढगाळ वातावरणासह पावसाच्या सरी बरसल्या. यामुळे मात्र जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला असून जिल्हावासीयांना हुडहुडी भरून आली आहे. सोमवारी (दि. २७) जिल्ह्याचे किमान तापमान १५.३ अंशावर आले होते. तर हवामान खात्याने जिल्ह्याला मंगळवारीही (दि. २८) यलो अलर्ट दिला आहे. अशात पावसाने हजेरी लावल्यास जिल्ह्यात थंडीचा जोर आणखी वाढणार आहे.
दिवाळीपासूनच जिल्ह्यात थंडी जाणवू लागली होती. मात्र पाहिजे तसा जोर नसल्याने हिवाळा खऱ्या अर्थाने सुरू झाला नव्हता. मात्र मागील काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढू लागला होता व सायंकाळ होताच गरम कपड्यांची गरज भासत होती. अशात वातावरणाने परत एकदा बदल दाखविला असून हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्यानुसार, मागील दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण तयार झाले होते. त्यातच हवामान खात्याने जिल्ह्याला सोमवारी व मंगळवारी यलो अलर्ट दिला होता. हवामान खात्याचा अंदाज येथे खरा ठरला असून, सोमवारी (दि. २७) सकाळपासूनच ढग दाटून आले असून त्यातच पावसाच्या सरी बरसल्या. यामुळे थंडीचा जोर वाढला असून ढगाळ वातावरण बघता पावसाळा परतून आल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. तर मंगळवारीही जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. अशात पाऊस बरसल्यास मात्र थंडीचा जोर आणखी वाढणार आहे.
गोंदिया विदर्भात तिसऱ्या क्रमांकावर -
- रविवारी जिल्ह्याचे कमाल व किमान तापमानही घसरले होते. कमाल तापमान २९.६ अंशांवर आले असतानाच किमान तापमान १३ अंशांवर आले होते व जिल्हा विदर्भात पहिल्या क्रमांकावर होता. मात्र सोमवारी कमाल तापमानात आणखी घट झाली असून ते २५.२ अंशांवर आले होते. तर किमान तापमान १५.३ अंशावर गेले होते. यानंतर जिल्हा विदर्भात तिसऱ्या क्रमांकावर होता. पाऊस बरसल्यास तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे.
लहान मुले व वृद्धांची काळजी गरजेची
- अचानकच वातावरण होणारा बदल आरोग्याच्या समस्या निर्माण करीत असून जिल्ह्यात सर्दी, खोकला व तापाचे रुग्ण वाढले आहेत. अशात आता पावसाळी वातावरण व त्यात थंडीचा जोर वाढला असल्याने वृद्ध व लहान मुलांची काळजी घेणे गरजेचे आहे. शिवाय, गरम कपड्यांचा वापर करूनच घराबाहेर पडणे जास्त सुरक्षित आहे.
प्रथम पाच शहरांचे किमान तापमान
शहर- किमान तापमान (अंश सेल्सिअस)
वाशिम- १४.८
बुलढाणा- १५.०
गोंदिया- १५.३
यवतमाळ- १५.५
गडचिरोली- १५.६