देवाची श्रद्धा दाखवून महिलेचे मंगळसूत्र पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:32 AM2021-09-05T04:32:44+5:302021-09-05T04:32:44+5:30
अर्जुनी मोरगाव : देवाची श्रद्धा दाखवून काउंटरवर ठेवलेल्या पॉलिथिनचा मंगळसूत्राला स्पर्श करण्यास सांगितले. डोळे मिटून दोन्ही हात जोडा व ...
अर्जुनी मोरगाव : देवाची श्रद्धा दाखवून काउंटरवर ठेवलेल्या पॉलिथिनचा मंगळसूत्राला स्पर्श करण्यास सांगितले. डोळे मिटून दोन्ही हात जोडा व नमस्कार करा, अशी बतावणी करून महिला व्यावसायिकाच्या गळ्यातील मंगळसूत्र अज्ञात भामट्याने पळविले. ही घटना खरेदी-विक्री संकुलातील एका जनरल स्टोअर्समध्ये शुक्रवारी दुपारी घडली.
नवेगावबांध मार्गावरील खरेदी विक्री समिती परिसर हा गजबजलेला व वर्दळीचा आहे. खरेदी-विक्री समितीची दुकान गाळे आहेत. येथे ओजस जनरल अँड मॅचिंग सेंटर या नावाचे दुकान आहे. शुक्रवारी (दि.३) दुकानात सपना प्रदीप शहारे या होत्या. दुपारी एक अनोळखी इसम दुकानात आला. त्याने त्या महिला दुकानदाराला देवाच्या नावाची श्रद्धा दाखविली. त्याने दुकानाच्या काउंटरवर ठेवलेल्या पॉलिथिनला आपल्या मंगळसूत्राचा स्पर्श करण्यास सांगितले. दोन्ही हात जोडून डोळे मिटण्यास सांगितले व पाया पडण्याचा त्या महिला दुकानदाराला सल्ला दिला. त्या महिलेने अनोळखी इसमाने सांगितल्याप्रमाणे केले. त्या इसमाने पॉलिथिन महिलेच्या हातात दिली. अर्ध्या तासानंतर पॉलिथिन एखाद्या गरजू व्यक्तीला देण्याचे सांगून तो अनोळखी इसम निघून गेला. सुमारे दहा मिनिटांनंतर मंगळसूत्र गळ्यात नसल्याचे तिच्या लक्षात आले. तिने दुकानात सर्वत्र व पॉलिथिनमध्ये मंगळसूत्र शोधले. मात्र, ते दिसून आले नाही. शेजारील दुकानदारांना व इतर व्यक्तींना त्या इसमाविषयी विचारणा केली. तो इसम सापडून आला नाही. तेव्हा आपली फसवणूक करून १२ ग्राम वजनाचा मंगळसूत्र त्या अनोळखी इसमाने लंपास केल्याचे त्या महिलेच्या लक्षात आले. लगेच त्या महिलेने पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदविली. त्या अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक कदम व पोलीस नायक बोरकर पुढील तपास करीत आहेत. घटनास्थळाला पोलीस उपअधीक्षक नालकुल यांनी भेट दिली.
040921\1211-img-20210904-wa0003.jpg
याच ओजस जनरल अँड मॅचिंग सेंटरमधून मंगळसूत्र लांबविले