लॉक-अनलॉकच्या गोंधळात शटर अर्ध्यावर ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:22 AM2021-06-06T04:22:07+5:302021-06-06T04:22:07+5:30
गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने राज्य शासनाने काही निर्बंध शिथिल करून व्यापाऱ्यांना दिलासा दिला आहे. याअंतर्गत ...
गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने राज्य शासनाने काही निर्बंध शिथिल करून व्यापाऱ्यांना दिलासा दिला आहे. याअंतर्गत दुपारी २ वाजेपर्यंत दुकान सुरू ठेवण्याचे व शनिवारी आणि रविवारी संपूर्ण बंदचे आदेश काढण्यात आले आहेत. मात्र शनिवारी (दि. ५) अवघ्या शहरातच बंदीचे आदेश धुडकावून दुकाने सुरू असल्याचे दिसले. यामुळे लॉक की अनलॉक या गोंधळात व्यापारी व ग्राहक होते.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केल्याने मागील सुमारे दीड-दोन महिन्यांपासून लॉकडाऊन करण्यात आले होते. यात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सोडून अन्य दुकाने पूर्णपणे बंदच होती. परिणामी एवढ्या काळात झालेल्या नुकसानीने व्यापारी चांगलेच अडचणीत आले आहेत. सुदैवाने आता जिल्ह्यातून कोरोनाची दुसरी लाट पाय पसरत असून, बाधितांची टक्केवारी नियंत्रणात असल्याने राज्य शासनाने अनलॉकच्या यादीत जिल्ह्याचा समावेश केला आहे. त्यानुसार, सर्वच दुकानांना आता दुपारी २ वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली आहे; तर शनिवारी व रविवारी सर्वच बंद राहणार, असेही आदेश काढण्यात आले आहेत.
शिथिलतेचे आदेश लागू झाल्यानंतर पहिल्याच शनिवारी (दि. ५) मात्र आदेशाची धुडकावणी झाल्याचे शहरात दिसून आले. शनिवारी पूर्ण बंद असतानाही शहरात सर्वच काही सुरू असल्याचे दिसले. त्यात बाजारात नेहमीप्रमाणे सर्व दुकाने सुरू होती व नागरिकांची गर्दीही तेवढीच दिसली. दुपारपर्यंत व्यापाऱ्यांनी आपला व्यापार करून घेतला व त्यामुळे जिल्हा प्रशासनाला शनिवारी बंदचे आदेश आहेत, याचा विसर पडला की काय, असेच वाटू लागले.
--------------------------
पोलीस गाडी आल्यावर केली दुकाने बंद
शनिवारी दुपारी १ वाजता पोलिसांची गाडी व त्यांनी व्यापाऱ्यांना माईकवरून दुकान बंद करण्यास सांगितल्यानंतर व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानांचे शटर खाली पाडले. विशेष म्हणजे, व्यापाऱ्यांचे चांगलेच नुकसान होत आहे, यात शंका नाही.
-----------------------------------
नियमांकडे दुर्लक्ष नकोच
मागीलवर्षीही लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आल्यानंतर व्यापाऱ्यांनी मनमर्जीपणे व्यापार केला. यात मात्र त्यांना मास्क, सॅनिटायझर, शारीरिक अंतर आदी नियमांची धुडकावणी केली. परिणामी जिल्ह्यात कोरोनाने कहर केला होता. त्याचे परिणाम कित्येक व्यापाऱ्यांनाही भोगावे लागले होते. आता सुदैवाने जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात आली आहे. मात्र मागील वर्षी झालेली चूक पुन्हा होऊ नये एवढे भान मात्र नक्कीच बाळगणे गरजेचे आहे.