हे दृश्य विलोभनीय.. पाणवठे फुलले स्थलांतरित पक्ष्यांनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2022 03:27 PM2022-02-12T15:27:57+5:302022-02-12T15:34:17+5:30
यावर्षी नवेगावबांध व सिरेगावबांध या मोठ्या जलाशयांसह छोटे तलाव, बोड्या व पाणवठ्यांवर त्यांची मोठी गर्दी दिसून येत आहे.
संतोष बुकावन
अर्जुनी-मोरगाव (गोंदिया) : सातासमुद्रापार उड्डाण करीत दरवर्षी जिल्ह्यातील जलाशय, तलाव, बोड्या व पाणवठ्यांवर स्थलांतरित पक्षी हजेरी लावतात. यंदा या पक्ष्यांत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. उकाड्यापासून बचाव व खाद्याच्या आकर्षणापोटी हिवाळ्यात भारतात स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन होते. विलोभनीय व देखण्या या पक्ष्यांचे थवे स्थानिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
स्थलांतरित पक्षी ज्या प्रदेशात वावरतात तेथील उकाड्यापासून होणारी अंगाची काहिली, बर्फवृष्टी व खाद्यान्नाची कमतरता यामुळे विशेषतः हिवाळ्यात विदेशी पक्षी भारताच्या थंड भागात प्रवेश करतात. भरपूर खाद्य व पोषक वातावरणाच्या आकर्षणापोटी ते भारतासारख्या समशीतोष्ण वातावरणात स्थलांतर करतात. प्रजननातील अडचणी हेसुद्धा स्थलांतराचे एक कारण मानले जाते. विशेषतः युरोप, सायबेरिया व मंगोलिया तसेच हिमालयाकडून ते भारतात प्रवेश करतात. साधारणतः नोव्हेंबर महिन्यात आगमन होते तर एप्रिल महिन्याच्या प्रारंभी त्यांचा परतीचा प्रवास सुरू होतो. ५ महिने ते परदेशी पाहुणे आपल्या देशात मुक्कामी असतात. या वर्षी नवेगावबांध व सिरेगावबांध या मोठ्या जलाशयांसह छोटे तलाव, बोड्या व पाणवठ्यांवर त्यांची मोठी गर्दी दिसून येत आहे.
जलाशयांवर आढळणारे पक्षी
स्थानिक विविध पाणवठ्यांवर पिंटेल, ग्रेलेग गुज, कॉमन पोचार्ड, व्हाईट आय पोचार्ड, युरेशियन विजन, मलाई गार्गणी, लेसर विसलिंग डक, कुडस, युरोप, आशिया, चीन व जपान देशात आढळणारे कॉमन टिल, युरोप, आशिया व अमेरिकेत आढळणारे पिंटेल, टपटेल, पोचार्ड, लिटल ग्रेब, वुडसँड पायपर ( छोटी तुतवार), युरेशीयन कर्लु, लिटिल स्टिंट, रिंगप्लवर, मार्स हेरीअर, पेंटेड स्नाईप, ग्रे हेरान, कोम्बच डक ( नाकेर) आदी प्रजातींचे पक्षी या परिसरातील जलाशयांवर दरवर्षी हिवाळ्यात येतात.
माहुरकुडा तलाव ‘फुल्ल’
माहुरकुडा तलावावर यंदा पक्ष्यांची संख्या भरपूर आहे. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येत पक्षी बघावयास मिळत आहेत. एका विशिष्ट प्रजातींच्या मुबलक प्रमाणातील ही संख्या थक्क करणारी आहे. सुमारे ४०० ते ५०० च्या संख्येत रेड क्रेस्टेड पोचार्ड या तलावावर मुक्कामी आहेत. गेल्या १५ वर्षांच्या संख्येची गोळाबेरीज केली तरी जेवढे पक्षी आहेत तेवढी संख्या होणार नाही असे अभ्यासक सांगतात. माहुरकुडा तलावावर एकजात एवढ्या संख्येत आलेले पक्षी नेमके कशावर आकृष्ट झाले हा संशोधनाचा विषय आहे.
तालुक्यात दरवर्षी मोठ्या संख्येत स्थलांतरित पक्षी येतात व दरवर्षी आम्ही निरीक्षण करतो. मात्र, माहुरकुडा तलावावरील रेड क्रेस्टेड पोचार्ड पक्ष्यांची संख्या कुतूहल निर्माण करणारी आहे. पक्षी प्रेमींसाठी ही एक पर्वणीच आहे. विशेष म्हणजे, पंधरवडाभर ही संख्या कायम आहे. अजूनही काही काळ ही संख्या कायम राहू शकते असा कयास आहे.
- प्रा. अजय राऊत
-प्रा. डॉ. शरद मेश्राम
पक्षिप्रेमी व अभ्यासक, अर्जुनी- मोरगाव