सिलेगाव शाळेचा ‘शिक्षक आपल्या दारी’ हा उपक्रम ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:20 AM2021-07-15T04:20:56+5:302021-07-15T04:20:56+5:30
गोरेगाव : तालुक्यातील सिलेगाव येथील जि. प. वरिष्ठ प्राथमिक शाळेच्यावतीने मुख्याध्यापक कमलेश मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली ‘शाळा बंद, पण शिक्षण ...
गोरेगाव : तालुक्यातील सिलेगाव येथील जि. प. वरिष्ठ प्राथमिक शाळेच्यावतीने मुख्याध्यापक कमलेश मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली ‘शाळा बंद, पण शिक्षण चालू’ या उपक्रमाअंतर्गत ‘शिक्षक आपल्या दारी’ या उपक्रमाची सुरुवात गावातील विद्यार्थ्यांच्या पालकांसमवेत भेटीगाठीद्वारे करण्यात आली.
कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. अशातच विद्यार्थ्यांकरिता ऑफलाईन शाळा बंद आहेत. यामुळे पालकांच्या मनात शिक्षणाबाबत चिंता निर्माण झाली आहे. २०२१-२२ मध्ये शाळा सुरू होतील की नाही, मुलांचे शिक्षण कसे होणार, ऑनलाईन शिक्षणाचे नियोजन कशापद्धतीने राबिवले जात आहे, पुस्तक वाटप, सेतू अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडणे, या विषयांवर प्रत्यक्ष भेटीद्वारे चर्चा करण्यात आली. ऑनलाईन आलेला अभ्यास विद्यार्थी सोडवितात का? विद्यार्थ्यांची ऑनलाईन क्लाससाठी असलेली अल्प उपस्थिती यांची कारणे, विद्यार्थ्यांच्या अडचणी आदी जाणून घेऊन त्यावर चर्चा करण्यात आली. शिक्षक आपल्या घरी आलेत, हे पाहून विद्यार्थी अवाक् झाले. मागील दीड वर्षांपासून विद्यार्थी शाळेतच आले नाहीत. ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत अभ्यासक्रम पोहोचवला जात असला, तरी काही विद्यार्थ्यांकडे मोबाईल नाहीत. अशा विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष भेटीतून संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या. कोरोना जाईपर्यंत मोबाईल ही विद्यार्थ्यांची शैक्षणिक गरज म्हणून पाहावे. शाळेच्या या उपक्रमाचे पालकांनी कौतुक करून समाधान व्यक्त केले. या उपक्रमासोबतच पालक म्हणून आपली जबाबदारी काय असली पाहिजे, विद्यार्थ्यांची काळजी कशी घ्यावी, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमामध्ये सुंदरसिंग साबळे, आर. वाय. डहाके, टी. वाय. भगत, यू. डी. चकोले आदी शिक्षकांनी सहभाग घेतला.
............. कोट...
पालकांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाविषयी जागृत राहून शिक्षणाच्या प्रवाहात आपला पाल्य कसा राहील, याकडे लक्ष द्यावे. शिक्षक आपल्या दारी हा उपक्रम दररोज राबवणे सुरू असून, त्याद्वारे विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला जाणार आहे.
- कमलेश मेश्राम, मुख्याध्यापक.