आरक्षणासाठी शांततेत कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 10:02 PM2018-08-09T22:02:59+5:302018-08-09T22:03:34+5:30
मराठा आरक्षणाच्या मागणीला घेऊन अवघ्या राज्यातच पुकारण्यात आलेल्या बंद अंतर्गत गुरूवारी (दि.९) गोंदिया शहरात शांततेत कडकडीत बंद पाळण्यात आला. बंदसाठी मराठा समाजबांधवांनी शहरात दुचाकी रॅली काढली. शहरातील व्यापाऱ्यांनी सुध्दा मराठा समाजबांधवानी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मराठा आरक्षणाच्या मागणीला घेऊन अवघ्या राज्यातच पुकारण्यात आलेल्या बंद अंतर्गत गुरूवारी (दि.९) गोंदिया शहरात शांततेत कडकडीत बंद पाळण्यात आला. बंदसाठी मराठा समाजबांधवांनी शहरात दुचाकी रॅली काढली. शहरातील व्यापाऱ्यांनी सुध्दा मराठा समाजबांधवानी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली होती. आंदोलनात मराठा समाजातील महिला व पुरूषांसह चिमुकलेही रस्त्यावर उतरले होते. त्यानंतर शिष्टमंडळाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांच्या नावे उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांना देण्यात आले.
मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. मराठा समाज आता आरक्षणाच्या मागणीवर अडून बसला आहेत. यातच सरकारला मराठा शक्ती दाखवून देण्यासाठी गुरूवारी (दि.९) महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार, गोंदिया येथील मराठा समाजबांधवांनी गोंदिया बंदचे आवाहन केले होते.
मराठा समाजबांधवांनी गुरूवारी (दि.९) सकाळी ८ वाजता मोटारसायकल रॅली काढली. त्यानंतर सकाळी ११ वाजता येथील नेहरू चौकात मराठा समाजातील महिला, पुरूष व मुले एकत्र झाले. येथून शहरातील बाजार भागात पायी रॅली काढण्यात आली.
रॅलीत मराठा महिला, पुरूष व मुलांनी आरक्षणाच्या मागणीला घेऊन घोषणा दिल्या. नेहरू चौकात रॅलीचा समारोप करण्यात आला. त्यानंतर येथे जिल्हाधिकाºयांचे प्रतिनिधी म्हणून उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांच्यामार्फत मराठा समाजाला आरक्षण द्या या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले. निवेदनातूृन मराठा समाजाला आरक्षण इतर सोयी सुविधा लागू करण्याची मागणी केली. याप्रसंगी मराठा समाजाचे महेंद्र बडे, अजय जाधव, दीपक कदम, सुनील धवने, होमेंद्र तुपकर, प्रतीक कदम, विवेक जगताप, पंकज सावंत, पवन शिंदे, अभय सावंत, अविनाश पवार, अनिल काळे, दिलीप काळे, संजय शिंदे, सुशील केकत, अरूण जाधव, दत्ता सावंत आलोक पवार, विजय माने, पराग कदम, प्रदीप माने, सागर कदम, विजय कोतवाल, पंकज शिंदे, रमेश दलदले, राजु तुपकर, महेंद्र माने, द्वारकाताई सावंत, सीमा बढे, भावना कदम, योजना कोतवाल, श्रृती केकत, कृपा कदम, स्मिता केकत, माया सनस, प्रिया सावंत, बुलू सावंत, मोना पवार, प्रांजली जगताप, सविता कोतवाल यांच्यासह मराठा समाजबांधव सहभागी झाले होते.
बंदला घेऊन शहरात तगडा बंदोबस्त
मराठा आरक्षणाचा विषय चिघळत चालला असून राज्यात अन्यत्र याला हिंसक वळण आले आहे. याच पार्श्वभूमिवर शहरात पोलीस विभागाने तगडा बंदोबस्त लावला होता. शहरात मुख्य चौकात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. एवढेच नव्हे तर मराठा समाजबांधवांच्या मोटारसायकल व पायी रॅलीसह पोलीस कर्मचारी फिरत होते. विशेष म्हणजे, मराठा समाजाच्या या बंदला घेऊन बुधवारीच अतिरीक्त कुमक मागविण्यात आली होती.
राजकीय पक्ष व संघटनांचे समर्थन
मराठा समाजाने पुकारलेल्या या बंदला महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बहुजन समाज पक्ष, शिवसेना, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, संत गाडगेबाबा धोबी समाज आदिंनी समर्थन दिले होते.
शाळा- महाविद्यालयांना सुटी
मराठा समाजाने बंद पुकारत बुधवारीच (दि.८) शहरातील समस्त शाळा-महाविद्यालयांना पत्र देऊन गुरूवारी (दि.९) बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. मराठा समाजाच्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील सर्वच शाळा-महाविद्यालयांना सुटी देण्यात आली होती. विशेष म्हणजे, शहरातील व्यापाºयांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून १०० टक्के बंद पाळण्यात मराठा समाजाला सहकार्य केले.