ग्रामसेवकांचा जिल्हा परिषदवर मूक मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 12:20 AM2018-01-25T00:20:47+5:302018-01-25T00:20:58+5:30
ग्रामपंचायतच्या नियमीत कामाचा अतिरिक्त बोझा ग्रामसेवकांवर आहे. अतिरिक्त ताण, आर्थिक पिळवणूकीमुळे राज्यातील ५० ग्रामसेवकांनी मागील दोन वर्षात आत्महत्या केल्या. कामाच्या तणावात असताना ग्रामसेवकांचे झालेले अपघात व काही नागरिकांकडून १५०० ग्रामसेवकांवर झालेले प्राणघातक हल्ले .....
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : ग्रामपंचायतच्या नियमीत कामाचा अतिरिक्त बोझा ग्रामसेवकांवर आहे. अतिरिक्त ताण, आर्थिक पिळवणूकीमुळे राज्यातील ५० ग्रामसेवकांनी मागील दोन वर्षात आत्महत्या केल्या. कामाच्या तणावात असताना ग्रामसेवकांचे झालेले अपघात व काही नागरिकांकडून १५०० ग्रामसेवकांवर झालेले प्राणघातक हल्ले याचा निषेध नोंदविण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या नेतृत्त्वात बुधवारी (दि.२४) जिल्हा परिषदेवर मूक मोर्चा काढण्यात आला.
ग्रामीण जनतेशी निगडीत कामे करताना ग्रामसेवकांना बऱ्याच तणावात राहावे लागते. गाव पातळीवर तलाठी, कृषी सहाय्यक, आरोग्य सेवक, वॉयरमन, ग्रामविकास सोसायटीचे सचिव, अंगणवाडी सेविका, मुख्याध्यापक, शिक्षक हे घटक असतानाही त्यांची कामे ग्रामसेवकांकडे सोपविली जातात. कर्जमाफी फार्म भरणे, कर्जासंबधी ग्रामसभा, बोंडअळीचे पंचनामे, घर विद्युत सर्वेक्षण, कृषी पिक विमा, पीक कापणी प्रयोग, मतदार याद्या सर्वेक्षण, पाणलोटाची कामे, नवीन वाळू धोरण, स्वच्छ भारत मिशन, महसूल विभागाच्या वैयक्तीक लाभाच्या योजना, बोगस रेशनकार्ड मोहीम अशी विविध कामे दिली जातात. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दबाव, विना चौकशी, विना नोटीसाने निलंबित केले जाते. वेतनवाढ बंद करणे, विना पगारी करणे, यामुळे त्रस्त झालेल्या ग्रामसेवकांचे कुणीही ऐकायला तयार नाहीत. त्यामुळे ग्रामसेवकांनी बुधवारी जिल्हा परिषदेवर मूक मोर्चा काढून त्यांच्या समस्यांकडे शासन आणि प्रशासाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. धुळे जिल्ह्याच्या गोंदूर येथील ग्रामसेवक एस.बी.वाघ यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. मोर्च्याचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष कमलेश बिसेन, सचिव दयानंद फटींग, मानद अध्यक्ष कार्तिक चव्हाण, उपाध्यक्ष सचिन कुथे, कविता बागडे,, एल.आर.ठाकरे, सुनील पटले, सुरेश वाघमारे, ओ. के. रहांगडाले, सुषमा वाढई, सुभाष सिरसाम, रामेश्वर जमईवार, परमेश्वर नेवारे, योगेश रूद्रकार, पांडुरंग हरिणखेडे, धर्मेंद्र पारधी, ओ.जी. बिसेन, रितेश शहारे, तारेश कुबडे यांनी केले.