साधेपणाने गुढी उभारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:27 AM2021-04-13T04:27:41+5:302021-04-13T04:27:41+5:30
मराठी महिन्याची सुरुवात चैत्र महिन्यात गुढीपाडव्याच्या दिवसाने होते. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्व जण घरोघरी गुढी उभारतात. एका उंच काठीला ...
मराठी महिन्याची सुरुवात चैत्र महिन्यात गुढीपाडव्याच्या दिवसाने होते. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्व जण घरोघरी गुढी उभारतात. एका उंच काठीला रेशमाच्या खणाची घडी बांधतात. त्यावर चांदीचा गडू उपडा घालतात. कडुलिंबाची डहाळी व आंब्याची पाने त्यावर बांधतात. साखरेची गाठी व फुलांचा हार गुढीला चढवून घरासमोर उंच ठिकाणी गुढी उभारतात. गुढीपाडवा खासकरून महाराष्ट्रात साजरा केला जातो. लोक या दिवशी नवीन कपडे घालतात. हा सण मित्र, कुटुंबातील सदस्य आणि नातेवाइकांसोबत मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या विशेष दिवशी पुरणाची पोळी आणि श्रीखंड बनविले जाते. याशिवाय, गोड भातही बनविला जातो. मात्र यंदा कोरोनामुळे परिस्थिती सामान्य नसून यंदा साधेपणाने घरात राहूनच गुढी उभारा, असे डॉ. हुबेकर यांनी कळविले आहे.
----------------------------
खरेदीचा मोह टाळा
सध्या महाराष्ट्रात कोरोनाने हैदोस घातला आहे. त्यामुळे बाहेर जाणे म्हणजे कोरोनाला स्वतःहून आमंत्रण देण्यासारखे झाले आहे. गुढी उभारण्यासाठी आणि तिची पूजा करण्यासाठी प्रत्येक घरात जय्यत तयारी असते. या पूजेसाठी लागणारी फुले, साखरेच्या माळा, दारावर तोरण, गोडधोड पदार्थ, बांबूची काठी अशा अनेक साहित्यांची खरेदी केली जाते. पण यंदा आरोग्याच्या हितासाठी पूजेच्या या साहित्यांची खरेदी न करताच गुढीपाडवा साजरा करणे गरजेचे आहे. घरी असेल त्या वस्तूंचा वापर करून आपण सण साजरा करूया.
- डॉ. सुवर्णा हुबेकर,
निवासी वैद्यकीय अधिकारी
केटीएस, गोंदिया