साहेब, काही करा; पण एक रेमडेसिविर इंजेक्शन मिळवून द्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 05:00 AM2021-04-18T05:00:00+5:302021-04-18T05:00:20+5:30
रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याने शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयातील बेडसुद्धा हाऊसफुल झाले असून काही रुग्णालयात तर वेटिंग आहे. रुग्णांना दाखल करण्यासाठी लोकप्रतिनिधी, नगरसेवक, पत्रकार या सर्वांनाच फोन करून साहेब काही होत असेल तर पाहा ना, माझ्या वडिलाला दाखल करायचे आहे, अशी विनंती करणारे फोन येत आहे. पण शासकीय व खासगी रुग्णालयातसुद्धाजागा नसल्याने त्यांचेसुद्धा काहीच चालत नसल्याचे चित्र आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : साहेब माझी आई रुग्णालयात दाखल आहे, डॉक्टर म्हणतात रेमडेसिविर इंजेक्शन लावावे लागेल. सायंकाळपर्यंत किमान एकतरी रेमडेसिविर इंजेक्शन आणून द्या, असे सांगितले आहे. पण मेडिकलमध्ये इंजेक्शन घेण्यासाठी गेलो पण ते म्हणतात स्टॉक नाही, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून वितरण झाल्यानंतर ते उपलब्ध होईल असे सांगतात. मात्र आईची प्रकृती खालावत आहे. तिला किमान एक तरी रेमडेसिविर इंजेक्शन मिळवून द्या साहेब, अशी विनवणी करणारे फोन शनिवार दिवसभर येत होते. अशी बिकट स्थिती सध्या जिल्ह्यात निर्माण झाली आहे.
मागील आठवडाभरापासून जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. आठ दिवसात ८,३८५ बाधितांची नोंद झाली आहे. तर सात दिवसात ११७ बाधितांचा मृत्यू झाला आहे. रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याने शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयातील बेडसुद्धा हाऊसफुल झाले असून काही रुग्णालयात तर वेटिंग आहे. रुग्णांना दाखल करण्यासाठी लोकप्रतिनिधी, नगरसेवक, पत्रकार या सर्वांनाच फोन करून साहेब काही होत असेल तर पाहा ना, माझ्या वडिलाला दाखल करायचे आहे, अशी विनंती करणारे फोन येत आहे. पण शासकीय व खासगी रुग्णालयातसुद्धाजागा नसल्याने त्यांचेसुद्धा काहीच चालत नसल्याचे चित्र आहे. कोरोना बाधित गंभीर रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तर खासगी कोविड रुग्णालयात दाखल रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन लिहून दिले जात आहे. मात्र रेमडेसिविर इंजेक्शनचा सर्वत्र तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे याचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातून सर्व वितरकांना आणि खासगी कोविड रुग्णालयांना याचा पुरवठा केला जात आहे. मात्र कोरोना रुग्णांची संख्या अधिक असून त्या तुलनेत रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा होत नसल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांची मोठी परवड होत आहे. ही परवड पाहून कुणाचेही डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाही, अशी स्थिती आहे.
रुग्णालयातून इंजेक्शन बाहेर कसे?
जिल्ह्यात सध्या कोरोनाचा उद्रेक झाला असून रेमडेसिविर इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. रेमडेसिविर इंजेक्शन मेडिकलमध्येसुद्धा मिळत नसले तरी खासगी रुग्णालयातून रेमडेसिविर इंजेक्शन बाहेर येत असून एका इंजेक्शनची १३ ते २० हजार रुपयांनी विक्री केली जात आहे. रुग्णालयातून रेमडेसिविर इंजेक्शन कसे बाहेर येत आहे, हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे.
यांच्यावर कारवाई करणार काेण?
सध्या मेडिकल आणि रुग्णालयामध्येसुद्धा रेमडेसिविर इंजेक्शन मिळत नसल्याचे चित्र आहे. मात्र दुसरीकडे मार्केटमध्ये रेमडेसिविर इंजेक्शन १३ ते २० हजार रुपयांना उपलब्ध करून दिले जात आहे. तर हे इंजेक्शन उपलब्ध करून देणारेसुद्धा काही रुग्णालयांशी संबंधित असल्याची माहिती आहे. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांची लूट करणाऱ्यांवर कारवाई केव्हा करण्यात येणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.