साहेब खड्यातून प्रवास करायचा काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:20 AM2021-06-24T04:20:28+5:302021-06-24T04:20:28+5:30
आमगाव : गोंदिया-आमगाव राज्य महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. तर या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना तारेवरची ...
आमगाव : गोंदिया-आमगाव राज्य महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. तर या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. दाेन वर्षांतच या महामार्गाची वाट लागली असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तर अद्यापही रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नसल्याने साहेब खड्ड्यातूनच प्रवास करायचा काय, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
देवरी ते गोंदिया राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४३ वरील सिमेंट काँक्रीट रस्ते बांधकामाला सन २०१७-१८च्या बजेटमध्ये प्राधान्य देण्यात आले. यात देवरी ते आमगाव महामार्गावर सिमेंट काँक्रीटचे रस्ते बांधकामाला सुरुवात झाली आहे. पण आमगाव ते गोंदियापर्यंत महामार्गावर बांधकाम मंजुरीनंतरही अद्यापही आर्थिक नियोजन व कंत्राटाअभावी बांधकाम रखडले आहे. त्यामुळे या महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडून दुरवस्था झाली आहे. देवरी गोंदिया या राष्ट्रीय महामार्गावरील जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६, लांजी मध्य प्रदेश या राज्य महामार्ग क्रमांक ३६३ने जोडणारा मार्ग, सालेकसा आमगाव ते कामठा बालाघाट महामार्ग क्रमांक ३६५ जोडणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहतुकीची वर्दळ असते. राज्यअंतर्गत व राष्ट्रीय वाहतुकीला हा मार्ग मोकळा असल्याने या महामार्गाचे बांधकाम नियोजन करण्यात आले आहे. परंतु नियोजनातील निधी, कंत्राटाअभावी अजूनही कामाला सुरुवात झाली नाही. परिणामी नागरिकांची समस्या कायम आहे.
.............
खड्ड्यांमुळे वाहतुकीची कोंडी
गोंदिया-आमगाव या महामार्गावरील पडलेल्या खड्ड्यांमुळे नेहमीच या मार्गावर वाहतुकीची कोंडी होती. जड वाहनांची संख्या वाढत असल्याने वाहतुकीच्या कोंडीमुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग विभाग नागपूर या विभागाकडे अद्याप गोंदिया जिल्ह्यातील रखडलेले माहामार्गाचे नियोजन नसल्याचे चित्र आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग या रस्त्यांना राष्ट्रीय महामार्गाची रस्ते विकासासाठी मंजुरी असल्याचे सांगून वेळ काढून नेत असल्याने रस्त्याची समस्या कायम आहे.
...........
जीव मुठीत घेऊन करावा लागतो प्रवास
गोंदिया आमगाव या राष्ट्रीय महामार्गावर दळणवळणाची वर्दळ कमी होत नाही, तर महामार्गावरील वळण असलेले रस्ते खड्ड्यात सापडले आहेत. त्यात मार्गावरील खड्ड्यातून मार्ग शोधताना दमछाक होते. वाहतूक करताना खड्डे वाचवायला गेले की दुसरे वाहन आदळून अपघाताला सामोरे जावे लागते. या महामार्गावर जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. या समस्येकडे स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले.