साहेब, जरा इकडेही लक्ष द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 12:43 AM2018-02-01T00:43:01+5:302018-02-01T00:43:21+5:30
ग्रामीण भागातील गोरगरीब शेतकरी, शेतमजुरांच्या मुलांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी शासन सर्वतोपरी उपाययोजना करीत आहे. पण काही शिक्षकांचा बेजबाबदारपणा व हलगर्जीपणा यामुळे शैक्षणिक दर्जा कमकुवत होत चालला आहे.
राजेश मुनिश्वर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सडक अर्जुनी : ग्रामीण भागातील गोरगरीब शेतकरी, शेतमजुरांच्या मुलांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी शासन सर्वतोपरी उपाययोजना करीत आहे. पण काही शिक्षकांचा बेजबाबदारपणा व हलगर्जीपणा यामुळे शैक्षणिक दर्जा कमकुवत होत चालला आहे. याकडे गटशिक्षणाधिकारी सर्याम यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
तालुक्यात पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची संख्या ११३ आहे. तर तालुक्यात कोकणा (जमि), चिखली, डोंगरगाव (डेपो), शेंडा, पांढरी, डव्वा, कोसमतोंडी, सौंदड या नऊ केंद्रांचा समावेश आहे. यात विद्यार्थी संख्या ७ हजार ५०३ आहे. मुलांच्या विद्यार्जनासाठी ३९२ शिक्षकांची नियुक्ती केली आहे.
विद्यार्थ्यांना विद्यार्जनाचे धडे उत्तमप्रकारे दिले जावे यासाठी केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी यांची नियुक्ती केली आहे. गटशिक्षणाधिकारी म्हणून सर्याम कार्यरत आहेत. सदर अधिकारी सडक अर्जुनी पंचायत समितीमध्ये रूजू झाले त्यावेळी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत कोणताही शिक्षक तालुक्यात इतरत्र फिरताना दिसत नव्हता. पण सध्या अधिकाºयांच्या दुर्लक्षीतपणामुळे तालुक्याच्या शैक्षणिक दर्जा खालावत चालल्याचा पालकांचा आरोप आहे. तालुक्यातील १८ ते १५ किमी अंतरावरील शाळेत जावून बघितल्यास आढळते.
राजाच तसा तर प्रजा कशी राहणार? असे म्हणणे वावगे ठरणार नाही. काही अधिकारी दुर्लक्ष करित असल्याचे चित्र आहे.
तालुक्यातील काही शाळांतील शिक्षक लाखनी, भंडारा, अर्जुनी मोरगाव, गोरेगाव, गोंदिया, साकोली, देवरी या ठिकाणावरुन अप-डाऊन करतात. याचे प्रत्यक्ष उदाहरण सायंकाळी ४ वाजेपासून कोहमारा बसस्थानकावर पहावयास मिळते. पण कुणीही अधिकारी लक्ष देत नसल्याचे दिसत आहे. स्वत:च्या गळ्यात घंटा बांधणार कोण? अशी अवस्था झाली आहे.
तालुक्यातील जवळजवळ सर्वच शाळा परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ खाण्यास तसेच मद्यपान व धुम्रपान करण्यास मनाई आहे. तसे आढळल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असे सूचना फलक लावण्यात आले आहे. पण बहुतेक शाळेचे शिक्षकच खर्रा घेवून शाळेत येत असल्याचे पाल्य आपल्या पालकांना सांगतात. त्यामुळे या नियमाचा देखील शाळा परिसरात फज्जा उडत आहे.
शाळेत जाण्यापूर्वी रोज दोन खर्रे (पार्सल) शाळेत नेले जातात. पानठेलेवाले १० वाजताच खर्रा तयार ठेवतात. शिक्षकच खर्रा शाळेत खात असतील तर त्याचा वाईट परिणाम मुलांवर होईल. नुसते सूचना फलक लावून होणार नाही. त्याचे पालन खºया अर्थाने होते काय, याकडे अधिकाºयांनी लक्ष देण्याची नितांत गरज आहे.