साहेब... पॅसेंजर, लोकल केव्हा येणार रुळावर?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:33 AM2021-07-14T04:33:57+5:302021-07-14T04:33:57+5:30
सुरेंद्र भांडारकर मुंडीकोटा : हावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया हे एक प्रमुख रेल्वेस्थानक आहे. जिल्ह्यात सर्वत्र रेल्वेचे जाळे पसरले असल्याने प्रवाशांच्या ...
सुरेंद्र भांडारकर
मुंडीकोटा : हावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया हे एक प्रमुख रेल्वेस्थानक आहे. जिल्ह्यात सर्वत्र रेल्वेचे जाळे पसरले असल्याने प्रवाशांच्या दृष्टीने रेल्वे ही सोयीची आहे. शिवाय तिकीटदरही फारच कमी आहेत; त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना ते सोयीचे होते. पण कोरोनामुळे मागील दीड वर्षापासून लोकल आणि पॅसेंजर गाड्या रुळांवर आलेल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांना बसने अतिरिक्त भाडे माेजून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे ‘साहेब, पॅसेंजर आणि लोकल गाड्या केव्हा रुळांवर येणार?’ असा सवाल प्रवासी रेल्वे विभागाला करीत आहेत.
आता सर्वत्र कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला आहे. त्यामुळेच रेल्वे विभागाने काही विशेष आणि एक्सप्रेस गाड्या सुरू केल्या आहेत; पण मागील दीड वर्षापासून पॅसेंजर आणि लोकल गाड्या अद्यापही सुरू केलेल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांची अडचण कायम आहे. लोकल आणि पॅसेंजर गाड्या बंद असल्याने अद्यापही प्रवाशांना अतिरिक्त भाडे मोजून प्रवास करावा लागत असल्याने आर्थिक भुर्दंड बसत आहे. जिल्ह्यात मागील महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत आहे. मात्र पॅसेंजर आणि लोकल गाड्या अद्यापही सुरू झाल्या नाहीत. कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला असून, नागरिकही आता स्वत:ची काळजी घेत आहेत. रेल्वे विभागाने एक्सप्रेस गाड्या सुरू केल्या असून पॅसेंजर गाड्या सुरू करण्याची गरज आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना मदत होऊन आर्थिक भुर्दंड बसणार नाही. गाड्या बंद असल्यामुळे गोरगरीब प्रवाशांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे. त्यामुळे रेल्वे विभागाने प्रवाशांची अडचण आणि त्यांना बसणारा भुर्दंड लक्षात घेता,पॅसेंजर आणि लोकल गाड्या सुरू करण्याची गरज आहे.
.......
प्रवाशांच्या खिशावरील वाढला भार
जवळपास दीड वर्षापासून लोकल आणि पॅसेंजर गाड्या बंद आहेत. गोंदिया ते चंद्रपूर या अंतरासाठी रेल्वे प्रवाशांना केवळ ४० रुपये प्रवास भाडे लागत होते; तर गोंदिया ते तिरोडा १० रुपये, गोंदिया ते बालाघाट १५ रुपये, गोंदिया ते दुर्ग ५० रुपये प्रवासभाडे लागत होते. पण आता गोंदिया-चंद्रपूरसाठी बसने ३०० रुपये तिकिटासाठी मोजावे लागत आहेत; त्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड बसत आहे.
...........
पैसे आणि वेळेचाही अपव्यय
बसपेक्षा रेल्वेने कुठेही जलदगतीने प्रवास करता येतो. मात्र आता लोकल आणि पॅसेंजर गाड्या बंद असल्याने प्रवाशांना तिकिटासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागत आहेत; त्यामुळे पैसे आणि वेळेचाही अपव्यय होत होता.
........
या गाड्या केव्हा होणार सुरू
गोंदिया- बल्लारशा चांदाफोर्ट
गोंदिया- जबलपूर
गोंदिया- बालाघाट
गोंदिया - इतवारी
गोंदिया - दुर्ग
.........................
कोट
पॅसेंजर किंवा लोकल गाड्या सुरू करण्यासंदर्भात रेल्वे बोर्डाकडून अद्यापही कुठलेही निर्देश प्राप्त झालेले नाहीत; त्यामुळे या गाड्या केव्हा सुरू होणार, हे अद्यापही सांगता येणार नाही.
- ए. के. राय, जनसंपर्क अधिकारी.
.........