साहेब, मदत करा हो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2017 12:19 AM2017-09-06T00:19:07+5:302017-09-06T00:20:19+5:30

पावसाने दगा दिल्याने संपूर्ण जिल्ह्यासह सडक-अर्जुनी तालुक्यातही दुष्काळसदृश्य परिस्थिती दिसून येत आहे. तर दुसरीकडे महागाईनेही डोके वर काढले आहे.

Sir, please help! | साहेब, मदत करा हो!

साहेब, मदत करा हो!

Next
ठळक मुद्देदुष्काळसदृश्य परिस्थिती : बळीराजाची शासनाकडे आर्थिक मदतीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
सडक-अर्जुनी : पावसाने दगा दिल्याने संपूर्ण जिल्ह्यासह सडक-अर्जुनी तालुक्यातही दुष्काळसदृश्य परिस्थिती दिसून येत आहे. तर दुसरीकडे महागाईनेही डोके वर काढले आहे. या दोन्ही समस्यांमध्ये अडकलेल्या शेतकºयांनी ‘साहेब, मदत करा हो!’ असा टाहो फोडीत शासनाकडे मदतीची याचना केली आहे.
तालुक्याच्या १०८ गावांतील बहुतेक गावांमध्ये मिळेल त्या साधनाने सिंचनाची सोय करुन शेतकºयांनी कमी-जास्त प्रमाणात धानाची रोवणी केली. वडेगाव, परसोडी, चिखली, कोहमारा, सडक-अर्जुनी, डुग्गीपार, कोदामेडी, तिडका, पांढरवाणी, शेंडा, पुतळी, जांभळी, खडकी, बाम्हणी, सावंगी, राका, डव्वा, पांढरी, डुंडा, गोंगले, पाटेकुर्रा, भुसारीटोला, घोटी, सिंदीपार, खोडशिवनी, सिंदीबिरी, बोपाबोडी, बाणटोला, कोहळीटोला, केसलवाडा, उशीखेडा, आपकारीटोला, सहाकेपार आदी गावांत शासकीय तलावांतून धानशेतीला सिंचनाची सोय नसल्यामुळे यावर्षी शेतकºयांची ४० टक्के शेती पडीक राहिली आहे.
तालुक्याचे भौगौलिक क्षेत्र ५५ हजार ४७१ हेक्टर आर आहे. त्यात सिंचनाखाली येणारे क्षेत्र हे ९ हजार ९९५ हेक्टर क्षेत्र आहे. तर खरीप हंगामात लागवडीखाली येणारे क्षेत्र १९ हजार ५५१ हेक्टर क्षेत्र आहे. तर तालुक्यातील एकूण पिकाखाली येणारे क्षेत्र २२ हजार ८६७ हेक्टर आर क्षेत्र आहे.
सध्याच्या दुष्काळी तेराव्या महिन्यात महागाईने डोके वर काढल्याने जीवन जगायचे तरी कसे? अशी बिकट समस्या आता शेतकºयांचे पुढे उभी आहे. मुलांचे शिक्षण, लग्न व रोजच्या जगण्याच्या समस्या अल्पभुधारक, लहान शेतकºयांना जास्त भेडसावत आहेत. तालुक्यातील काही गरीब व कमी शेती असलेल्या शेतकºयांची संपूर्ण शेतीच पडीक आहे. दोन महिन्यानंतर रोवणी करण्यायोग्य पाऊस आला. काही शेतात कमी दिवसांत येणाºया धानाचे पºहे टाकले. मात्र त्या पºहाची रोवणीच केली नाही.
त्यातच मध्यम व भारी धानाची रोवणीसुध्दा शेतकºयांनी केली नाही. पुढील काळात पावसाचे असाच दगा दिल्याने बहुतेक शेतकºयांनी मध्यम, भारी धानाचीसुध्दा रोवणी केली नसल्याचे चित्र कोहमारा-मुरदोली परिसरात पहावयास मिळत आहे.
पावसाळ्याच्या शेवटच्या काळात पावसाने दगा दिल्यास एखाद्या पाण्याने धानपीक जावू नये यासाठी शेतकरी लहान तळी, बोडी तसेच बोअरवेल्सची सुविधा करुन ठेवतात. पण यावर्षी सुरुवातीपासूनच तालुक्यात फारच कमी पाऊस पडल्याने शेतकºयांच्या तळी, बोडी, शेतातील विहिरींना पाणीच आले नाही.
त्यामुळे रोवणी झाली नाही. पुढील काळात पावसाने पळ काढला तर तालुक्यात पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.
तालुक्यातील १०८ गावांपैकी बहुतेक गावांत घरगुती पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. अत्यल्प पाऊस आल्याने घरगुती विंधन विहिरींना पाणी नाही. १० ते १५ मिनिटे पंप चालनाºया विंधन विहिरी सडक-अर्जुनी शहरात पहावयास मिळतात. पावसाळ्याच्या दिवसातच विंधन विहिरींना पाणी नसल्याने नागरिक चिंतेत आहेत. पावसाच्या अभावाने पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवत आहे.
सिंचनासाठी मोठ्या प्रकल्पाची गरज
तालुक्यातील मनेरी, चिखली, बानटोला, कोहमारा, सडक-अर्जुनी, खडकी-बाम्हणी, सावंगी, वडेगाव, तिडका, देवपायली, भुसारीटोला, गोंगले, पांढरी, राका, शेंडा, उशीखेडा, जांभळी, दोडके आदी परिसरातील शेतकºयांच्या शेतीला हमखास सिंचनाची सोय मिळावी, यासाठी मोठ्या सिंचन प्रकल्पाची निंतात गरज आहे. शेतकरी पिकला तर सर्व सुखी, याप्रमाणे शेतकºयांची सिंचनाची समस्या मार्गी लावण्याची नितांत गरज आहे. याकडे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. तालुक्यात सिंचनाची सोय करण्यासाठी जांभळी गावाजवळ असलेला उमरझरी मध्यम प्रकल्प आता शोभेचा ठरत आहे. त्या प्रकल्पाचे कालव्याचे जाळे शेवटच्या टोकाला असलेल्या वडेगावपर्यंत पसरविण्यात आले. पण एकदाही त्या कालव्याने पाणी वडेगावाला देण्यात आले नाही, हे विशेष.
शासनाकडून मदतीची अपेक्षा
तालुक्यातील एकूण शेतीपैकी ४० टक्के रोवणी आजघडीला झाली आहे. गरीब व गरजू शेतकºयांना उडीद, मुंग, हरभरा, गहू, ज्वारी, सूर्यफूल, करडी, वाटाणा आदी रबी पिकांसाठी बियाणांचे वाटप करणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकºयांच्या जीवनाला हातभार लागेल. आजही चिखली, वडेगाव, परसोडी, कोहमारा, सडक-अर्जुनी, सौंदड, पांढरी, डोंगरगाव-डेपो, खजरी, डव्वा, सौंदड, डुग्गीपार, शेंडा परिसरात पºहेच्या पºहे आजही ‘जैसे थे’ उभे आहेत. शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून उभे असलेल्या पºह्याच्या सर्वेक्षणाची गरज आहे. शेतकºयांना नुकसान भरपाई मिळेल, या आशेने शेतकरी दारावर उभे आहेत.
दुष्काळ घोषित करा
लोकमत न्यूज नेटवर्क
साखरीटोला : पावसाने हुलकावणी दिल्याने अनेक शेतकºयांची रोवणी खोळबंली असून शेतकरी अस्मानी संकटात सापडला आहे. त्यामुळे शासनाने दुष्काळ घोषित करावा, अशी मागणी कारूटोला जि.प. क्षेत्राच्या सदस्य लता दोनोडे यांनी केली आहे.
आकाशात ढग जमा होत असले तरी प्रत्यक्षात मात्र पाऊस हुलकावणी देत आहे. ज्या प्रमाणात पाऊस पडणे गरजेचे आहे, त्यानुसार सरासरी पावसाचे प्रमाण कमी आहे. जून महिन्यात पाऊस विलंबाने आला. त्यामुळे भातरोपे उशीरा लावण्यात आली. जुलैमध्ये थोडाफार पाऊस पडला. त्यामुळे काही शेतकºयांनी रोवणी केली. आॅगस्टमध्ये पावसाची उघडझाप सुरू होती. आकाशात ढग जमा होतात, शेतकरी मोठ्या आशेने ढगाकडे पाहतात व आता तरी पाऊस पडेल, अशी आशा करतात. मात्र पाऊस वारंवार हुलकावणी देतो. त्यामुळे परिसरात हेटीटोला, कोटरा, साखरीटोला, चिचटोला, तुमडीटोला अशा अनेक गावांतील शेतकरी भातरोपे लावू शकले नाही. त्यामुळे यावर्षी शेतकरी धानपिकांपासून वंचित राहतील, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
ज्यांनी लागवड केली त्यांच्या धानालासुध्दा पाणी नाही. पुजारीटोला व ओवारा धरणेसुध्दा रिकामे आहेत. त्यामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा विचार करुन शासनाने सालेकसा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी लता दोनोडे यांनी केली.

Web Title: Sir, please help!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.