साहेब... आम्ही शेतकरी नाही का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 11:40 PM2018-02-15T23:40:22+5:302018-02-15T23:40:48+5:30

तिरोडा तालुक्यातील बोदलकसा सिंचन प्रकल्पाच्या क्षेत्रात भाडेतत्वावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मंगळवारी (दि.१३) झालेल्या गारपीट आणि वादळी पावसाचा फटका बसला. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

Sir ... we are not a farmer? | साहेब... आम्ही शेतकरी नाही का ?

साहेब... आम्ही शेतकरी नाही का ?

googlenewsNext
ठळक मुद्देभाडे तत्त्वावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा सवाल : मदतीपासून डावलण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : तिरोडा तालुक्यातील बोदलकसा सिंचन प्रकल्पाच्या क्षेत्रात भाडेतत्वावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मंगळवारी (दि.१३) झालेल्या गारपीट आणि वादळी पावसाचा फटका बसला. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र कृषी आणि महसूल विभागाकडून या शेतकऱ्यांच्या शेताचे पंचनामे करण्यास मनाई करुन मदतीपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे या शेतकºयांनी साहेब आम्ही शेतकरी नाही का? असा सवाल शासन आणि जिल्हाधिकाऱ्यांना केला आहे.
सिंचन विभागाच्या मध्यम प्रकल्पातंर्गत येणाऱ्या तिरोडा तालुक्यातील बोदलकसा सिंचन प्रकल्पातील पाणी कमी झाल्यानंतर या क्षेत्रातील जमिन शेतीसाठी निविदा काढून शेतकऱ्यांना भाडेतत्वावर दिली जाते. मागील अनेक वर्षांपासून ही प्रक्रिया राबविली जात आहे. यामुळे सिंचन विभागाला महसूल आणि शेतकऱ्यांना रब्बी हंगामात उत्पादन घेवून चार पैसे वाचविण्यास मदत होते. बोदलकसा सिंचन प्रकल्पाच्या क्षेत्रात जवळपास १ हजार हेक्टरवर जमिन आहे.
पावसाळ्यात या प्रकल्पात पाणी राहत असल्याने ती उपयोगात येत नाही. मात्र नोव्हेबरनंतर या प्रकल्पातील पाणी कमी झाल्यावर हे क्षेत्र कोरडे पडते. त्यामुळे सिंचन विभागाकडून ही जमिन चार ते पाच महिन्यांसाठी भाडेतत्वावर दिली जाते. जमिनीच्या क्षेत्रानुसार १ ते ५० हजार रुपयांपर्यंत त्याचे प्रती हेक्टरी दर आहेत. यंदा तिरोडा तालुक्यातील सिंचन प्रकल्पाच्या क्षेत्रातील केशव उईके, नानक बघेले, वासुदेव वाळे, दिलीप उईके, प्रल्हाद कोडापे, जयपाल किरसान, गोपाल किरसान, प्रितम पटले, सोमा रहांगडाले, हेमराज रहांगडाले, राजेंद्र फरकुंडे, विरम परतेती यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांनी बोदलकसा प्रकल्पाच्या क्षेत्रात भाडेतत्वावर शेती केली आहे. यापैकी काही शेतकऱ्यांनी गहू, हरभरा, वटणा, मक्का तर काही शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकांची लागवड केली. सुदैवाने यंदा रब्बीसाठी अनुकुल वातावरण असल्याने ही पिके देखील चांगली डोलदार आली होती. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यांवर समाधान होते. खरीपातील कसर रब्बी भरुन निघेल अशी त्यांना आशा होती. मात्र मंगळवारी झालेल्या वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पिके भूईसपाट झाल्याने केलेला लागवड खर्च सुध्दा भरुन निघण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे हे शेकडो शेतकरी संकटात आले आहे.
त्यांच्याजवळ जी काही जमापुंजी होती ती देखील त्यांनी खर्ची घातल्याने आता कुटुंबाचा वर्षभर उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. हेच काय कमी म्हणून त्यांना कृषी आणि महसूल विभागाच्या यंत्रणेकडून मदतीपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
इतर शेतकऱ्यांप्रमाणेच आमच्या शेतातील झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी त्यांनी तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यकांकडे केली.तेव्हा त्यांनी तुम्ही भाडेतत्वावर शेती केली असून तुमच्या शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश नसल्याचे सांगत पंचनामे करण्यास नकार दिला.
त्यामुळे गारपिटीच्या माऱ्याने आधीच जखमी झालेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळून त्यांना पुन्हा वेदना देण्याचे काम प्रशासनाकडून केला जात आहे. त्यामुळे हे शेतकरी हतबल झाले असून भाडेतत्वावर शेती केली म्हणून आम्ही शेतकरी नाही का? असा सवाल शासन आणि प्रशासनाला केला.
जिल्हाधिकारी व कृषी विभागाकडे घेतली धाव
तलाठी व कृषी सहाय्यकांनी या शेतकऱ्यांच्या शेतातील नुकसानीचे पंचनामे करण्यास नकार दिला.त्यामुळे या शेतकºयांनी थेट जिल्हाधिकारी आणि अधीक्षक कृषी अधिकारी यांचे कार्यालय गाठले. नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी केली. तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी पंचनामे करण्याचे निर्देश तलाठी आणि कृषी सहाय्यकांना दिल्याची माहिती आहे.
मदत न मिळाल्यास आंदोलन
केवळ भाडेतत्वावर शेती केली म्हणून गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्यापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न कृषी विभागाकडून केला जात आहे. मात्र आमच्या शेतातील नुकसानीचे पंचनामे न करुन नुकसान भरपाई मिळण्यापासून वंचित ठेवल्यास या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकºयांनी दिला.

Web Title: Sir ... we are not a farmer?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी