साहेब, कर्ज केव्हा मिळेल हो!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:20 AM2021-07-02T04:20:29+5:302021-07-02T04:20:29+5:30
सडक अर्जुनी : तालुक्यातील परसोडी-सडक येथील आदिवासी सोसायटीच्या अनागोंदी कारभारामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून पीक कर्ज ...
सडक अर्जुनी : तालुक्यातील परसोडी-सडक येथील आदिवासी सोसायटीच्या अनागोंदी कारभारामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.
गेल्या तीन महिन्यांपासून पीक कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रस्ताव सादर करूनसुद्धा आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांकडे सादर केला; पण याला तीन महिन्यांचा कालावधी लोटूनही पीक कर्ज मंजूर करण्यात आले नाही. त्यामुळे शेतकरी साहेब, कर्ज केव्हा मिळेल हो! अशी आर्त हाक देत आहेत.
सध्या सडक अर्जुनी तालुक्यातील शेतकऱ्यांनी रोवणीला सुरुवात केली आहे. संस्थेकडून पीक कर्ज काढून रोवणी करणे, रासायनिक खते, कीटकनाशक कामावर आलेल्या मजुरांना मजुरी देण्यासाठी कर्जाचा उपयोग केला जातो. या संस्थेकडे १३० कर्ज घेणारे शेतकरी लाभार्थी आहेत. कर्ज केव्हा मिळेल, याची रोज चौकशी केली असता, त्या शेतकऱ्यांना सोमवारी मिळेल, दोन दिवसात मिळेल, अशी उडवाउडवीची उत्तरे देऊन परत पाठविले जात आहे. विविध कार्यकारी सहकारी संस्था वेळेवर कर्ज देत नसेल तर त्याचा उपयोग काय? असा सवाल गरीब शेतकरी करीत आहेत. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.