साहेब, वाळू चोरीला जबाबदार कोण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:19 AM2021-06-30T04:19:20+5:302021-06-30T04:19:20+5:30
आमगाव : तालुक्यातील नदी आणि नाल्यांमधून मोठ्या प्रमाणात रेतीचा अवैध उपसा सुरू असून याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाल्याने शासनाचा ...
आमगाव : तालुक्यातील नदी आणि नाल्यांमधून मोठ्या प्रमाणात रेतीचा अवैध उपसा सुरू असून याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाल्याने शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन याला प्रतिबंध लावण्याची मागणी केली जात आहे.
आमगाव तालुक्यातील नदी पात्र साखरीटोला घाट, ननसरी नदी पात्र, वळद, किडंगीपार, किकरीपार, गणपती घाट, सावंगी या नदीतून दररोज मोठ्या प्रमाणात रेतीचा अवैध उपसा केला जात आहे. आमगाव व सालेकसा या दोन तहसीलअंतर्गत येणारे नदी पात्र व नाले यातील वाळू उपसा करण्यासाठी अद्यापही प्रशासनाने लिलाव प्रक्रिया पूर्ण केली नाही. त्यामुळे या नदी व नाले पात्रातील वाळू उपसा करण्यासाठी बंदी असताना मोठ्या प्रमाणात वाळूची चोरी करण्यात येत आहे. परंतु, प्रशासनाने रेती तस्करांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. आमगाव व सालेकसा तालुक्यांतील नदी, नाले पात्रातून अवैध वाळू चोरीला पायबंद घालण्यासाठी प्रशासनाने पाऊल उचलले नसल्याने शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. तालुक्यातील अनेक बांधकामांना प्रशासनाने मंजुरी दिली आहे. परंतु, या बांधकामांना मुदतपूर्व पूर्ण करून देण्याचे बंधने आहेत. वाळू उपसा करण्यासाठी नदी पात्राचे लिलाव करणे आवश्यक आहे. परंतु, शासकीय पातळीवर योग्य दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे समस्या कायम आहे.