संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात सिरेगाव ग्रामपंचायत राज्यात प्रथम
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 02:57 PM2024-09-21T14:57:44+5:302024-09-21T14:58:50+5:30
२५ वर्षात प्रथमच पहिले स्थान : २३ सप्टेंबरला होणार पुरस्काराचे वितरण
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन २०१८-१९ अंतर्गत राबविण्यात आलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत राज्यस्तरीय प्रथम पुरस्कारासाठी जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सिरेगाव बांध ग्रामपंचायत पात्र ठरली आहे. या स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा २३ सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगर येथे पार पडणार आहे.
सन २०१८-१९ या वर्षासाठी राबविण्यात आलेल्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेसाठी जिल्हा परिषद गटातून पात्र ठरलेल्या सिरेगाव बांध ग्रा.पं.ची जिल्हास्तरीय तपासणी समितीकडून तपासणी करण्यात आली. यात जिल्हास्तरावर देवरी तालुक्यातील भागी प्रथम तर अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सिरेगाव बांध ग्रा.पं. ने द्वितीय क्रमांक प्राप्त करीत दोन्ही ग्रामपंचायती विभागीय पुरस्कारासाठी पात्र ठरल्या होत्या.
विभागीय स्पर्धेत या दोन्ही ग्रामपंचायतींनी संयुक्तपणे द्वितीय क्रमांक पटकावत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरल्या होत्या. या ग्रामपंचायतींची राज्यस्तरीय तपासणी ६ ते ८ नोव्हेंबर २०२२ दरम्यान समिती अध्यक्षांचे प्रतिनिधी व अवर सचिव पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्रालय मुंबई चंद्रकांत मोरे, समिती सदस्य तसेच कक्ष अधिकारी बाळासाहेब हजारे, सहायक कक्ष अधिकारी पात्रे यांनी केली होती. राज्यस्तरीय स्पर्धेत कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर व अमरावती या सहा विभागातून १४ ग्रामपंचायती राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरल्या होत्या. राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल सिरेगाव बांध ग्रामपंचायतीचे जि.प. अध्यक्ष पंकज रहांगडाले, उपाध्यक्ष यशवंत गणवीर, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता विभाग आनंदराव पिंगळे, जिल्हा समन्वयक व शालेय स्वच्छता व आरोग्य सल्लागार भागचंद्र रहांगडाले यांनी कौतुक केले आहे.
जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी हे सन्मानित होणार
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबविताना अभियान कालावधीत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल विद्यमान जिल्हाधिकारी प्रजित नायर व जिल्हा परिषद गोंदियाचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी व विद्यमान जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग अनिल पाटील यांचाही सत्कार करण्यात येणार आहे.
२५ वर्षानंतर प्रथमच बहुमान
गोंदिया जिल्ह्याची निर्मिती झाल्याला २५ वर्षे पूर्ण झाली आहे. या कालावधीत संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात प्रथमच राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार सिरेगाव ग्रामपं चायतीच्या रुपाने जिल्ह्याला मिळाला आहे.
"अनेक वर्षानंतर संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात गोंदिया जिल्ह्यातील ग्रामपंचायत राज्यस्तरीय प्रथम पुरस्कारासाठी पात्र ठरली असल्याने निश्चितच जिल्ह्यासाठी कौतुकास्पद व अभिमानाची बाब आहे. लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन गावाचा विकास साधावा."
- पंकज रहांगडाले, जि.प.अध्यक्ष, गोंदिया
"सिरेगाव बांध सारखी छोटीशी ग्रामपंचायत आपल्या कार्य कर्तृत्वाच्या जोरावर राज्यस्तरावर जाऊन पुरस्कार प्राप्त करते हे कौतुकास्पद आहे. जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतींनीही या ग्रामपंचायतीचे अनुकरण करीत गावे आदर्श करण्यावर भर द्यावा."
- मुरगानंथम एम, जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी