उपचारात्मक सोयी सुविधांमुळे परिस्थिती नियंत्रणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:23 AM2021-05-03T04:23:54+5:302021-05-03T04:23:54+5:30
गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे निश्चितपणे आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला. त्यामुळेच आरोग्यविषयक सोयी-सुविधा कमी पडू लागल्या होत्या. मात्र, मागील ...
गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे निश्चितपणे आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला. त्यामुळेच आरोग्यविषयक सोयी-सुविधा कमी पडू लागल्या होत्या. मात्र, मागील १५ दिवसांपूर्वी केलेल्या तयारीनुरूप आता जिल्ह्यात उपचारात्मक सोयी सुविधा वाढविण्यावर भर दिला आहे. १२६ खाटांचे डीसीएचसी सुरू झाले आहे. आपत्ती व्यवस्थापनाकरिता अग्निशमन पथकातही भर पडली आहे. एकंदरीत गोंदिया जिल्ह्यात उपचारात्मक सोयी-सुविधांमुळे आगामी काळात संसर्गाची परिस्थिती निश्चितपणे नियंत्रणात येणार, असा विश्वास राज्याचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केला.
येथील जिल्हा क्रीडा संकुलातील १२६ खाटांचे डीसीएचसीचे लोकार्पण रविवारी करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. पालकमंत्री म्हणाले, खा. प्रफुल पटेल हे जिल्ह्याच्या कोरोना संसर्ग परिस्थितीसह इतर समस्यांवर विशेष लक्ष केंद्रित करून आहेत. यामुळे त्यांचे या जिल्ह्याला खूप सहकार्य मिळत आहे. आक्सिजन, रेमडेसिविर व औषधसाठा उपलब्ध करून देण्यास त्यांची मदत मिळत आहे. मागील आठवड्यात आपण जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना कोरोना संसर्गाची परिस्थिती निश्चितच चिंताजनक होती. यासाठी जिल्हा प्रशासनाला जिल्हा क्रीडा संकुल व पॉलिटेक्निक येथे १२६ व १०० खाटांचे डीसीएचसी उभारण्याचे निर्देश दिले होते. यानुरूप अत्यल्प काळात जिल्हा क्रीडा संकुल येथे डीसीएचसीचे काम पूर्ण करण्यात आले. डीसीएचसीमध्ये ११४ खाटा कुलर कुल्ड आहेत. तर १२ खाटा वातानुकूलित आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आली आहे. या डीसीएचसीमुळे निर्माण होणारा उपचारात्मक बाबींचा तुटवडा निश्चितपणे कमी होणार आहे. यावेळी माजी आमदार राजेंद्र जैन, आमदार मनोहर चन्द्रिकापुरे, आमदार सहेसराम कोरोटे, आमदार अभिजित वंजारी, जिल्हा प्रशासनचे अधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
......
रुग्णवाहिकांचा तुटवडा कमी झाला
५ रुग्णवाहिका जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या. गोंदिया नगरपरिषदेत आपत्ती व्यवस्थापनाकरिता दोन अग्निशमन पथकाचे वाहन उपलब्ध करून देण्यात आले. जिल्हा क्रीडा संकुल येथील डीसीएचसीचे कामे अत्यंत जलद गतीने करून घेण्यासाठी माजी आमदार राजेंद्र जैन यांचा सहकार्य मिळाले आहे. कोरोना नियंत्रणासाठी प्रशासन कटिबध्द असून त्या दृष्टीने उपाययोजना करण्यात येत असल्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.