रेमडेसिविर काळाबाजार प्रकरणातील सहा आरोपी निर्दोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:32 AM2021-08-27T04:32:12+5:302021-08-27T04:32:12+5:30
गोंदिया : रेमडेसिविर काळाबाजार प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा व गोंदिया शहर पोलिसांनी सापळा रचून अटक केलेल्या सहा आरोपींची गुरुवारी ...
गोंदिया : रेमडेसिविर काळाबाजार प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा व गोंदिया शहर पोलिसांनी सापळा रचून अटक केलेल्या सहा आरोपींची गुरुवारी (ता. २६) जिल्हा व सत्र न्यायालय गोंदियाचे मुख्य न्यायदंडाधिकारी एस.जे.भट्टाचार्य यांनी निर्दोष मुक्तता केली.
स्थानिक गुन्हे शाखा व गोंदिया शहर पोलिसांनी रेमडेसिविर इंजेक्शन व मिथाईल प्रेडनिसोलोन सोडियम इंजेक्शनच्या काळाबाजार प्रकरणात आरोपी अमोल चाैधरी याला पकडले होते. त्याची चाैकशी केली असता त्याने संजय तूरकर व गाविका चाैधरी यांची नावे सांगितली. त्यामुळे तिघांनाही ४ मे रोजी अटक केली होती. त्यानंतर या तिन्ही आरोपींना ५ मे रोजी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने तिन्ही आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. दरम्यान, २ ऑगस्ट रोजी पोलिसांनी आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते. त्याच दिवशी मुख्य न्यायदंडाधिकारी गोंदिया यांनी आरोपींवर दोषारोप लावले. आरोपींनी दोषारोप फेटाळल्याने ४ ऑगस्ट रोजी साक्षपुराव्याकरिता हा खटला न्यायालयात ठेवण्यात आला. याच दिवशी सरकारच्या बाजूने आरोपीविरुद्ध सहा साक्षीदार तपासण्यात आले. सरकारचे सगळे साक्षीदार तपासून व उभय पक्षांची बाजू एकूण गुरुवारी (दि. २६) मुख्य न्यायदंडाधिकारी एस.जे.भट्टाचार्य यांनी आरोपींची निर्दोष मुक्तता केली. आरोपी अमोल चाैधरी व संजय तूरकर यांची बाजू ॲड. प्रवीण श्यामकुवर व ॲड. देवेंद्र उर्फ चंदू पारधी यांनी मांडली. आरोपी गाविका चाैधरी यांची बाजू ॲड. अरुण उपवंशी यांनी मांडली.
................
रेमडेसिविर प्रकरणाचा २४ दिवसांच्या आत न्यायनिवाडा
दुसऱ्या प्रकरणात २० एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखा व गोंदिया शहर पोलिसांनी सापळा रचून आरोपी संजूकुमार बागडे याला रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करताना पकडले होते. त्यानंतर त्याची चाैकशी केली असता त्याने दर्पण वानखेडे व नितेश चिंचखेडे यांची नावे सांगितली. त्यामुळे पोलिसांनी त्यांनाही अटक केली होती. तिन्ही आरोपींना २१ एप्रिल रोजी न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. २ ऑगस्ट रोजी पोलिसांनी आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. त्याच दिवशी मुख्य न्यायदंडाधिकारी गोंदिया यांनी आरोपींवर दोषारोप लावले. आरोपींनी दोषारोप फेटाळल्याने ४ ऑगस्ट रोजी साक्षपुराव्याकरिता हा खटला न्यायालयात ठेवण्यात आला. याच दिवशी सरकारच्या बाजूने आरोपींविरुद्ध तीन साक्षीदार तपासण्यात आले. सरकारचे सगळे साक्षीदार तपासून व उभय पक्षांची बाजू ऐकून गुरुवारी मुख्य न्यायदंडाधिकारी एस. जे. भट्टाचार्य यांनी तिन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली. आरोपी संजूकुमार बागडे व नितेश चिंचखेडे यांची बाजू ॲड. प्रकाश तोलानी व आरोपी दर्पण वानखेडे यांची बाजू ॲड. मोहन गुप्ता यांनी मांडली. उल्लेखनीय म्हणजे, जिल्हा व सत्र न्यायालयात प्रथमच रेमडेसिविर प्रकरणाचा २४ दिवसांच्या आत न्यायनिवाडा करण्यात आला आहे.