सहा झाले मुक्त, दोन तालुके मुक्त होण्याच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:34 AM2021-09-14T04:34:20+5:302021-09-14T04:34:20+5:30
गोंदिया : कोरोनाबाधितांपेक्षा मात करणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने यशस्वी वाटचाल सुरू आहे. सोमवारी (दि.१३) तीन बाधितांनी ...
गोंदिया : कोरोनाबाधितांपेक्षा मात करणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने यशस्वी वाटचाल सुरू आहे. सोमवारी (दि.१३) तीन बाधितांनी कोरोनावर मात केली तर नवीन रुग्णाची भर पडली नाही. त्यामुळे जिल्ह्यात केवळ दोन ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आठपैकी सहा तालुके पूर्णपणे कोरोनामुक्त झाले असून गोंदिया आणि देवरी तालुक्यांत प्रत्येकी एक कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहे. त्यामुळे हे दोन्ही तालुके लवकरच कोरोनामुक्त होण्याची शक्यता आहे.
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने सोमवारी २३९ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी १६४ नमुन्यांची आरटीपीसीआर तर ७५ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात एकही नमुना कोरोनाबाधित आढळला नाही. त्यामुळे कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट शून्य होता. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत ४४९८०९ नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे. यापैकी २२९८५४ नमुन्यांची आरटीपीसीआर तर २१९९५५ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात ४१२११ नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले यापैकी ४०५०२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत २ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून जिल्हा लवकरच पूर्णपणे कोरोनामुक्त होण्याची शक्यता आहे.
..................
८७८६८३ नागरिकांचे लसीकरण
कोरोनाविरुद्धच्या लढ्यात लसीकरण हे महत्त्वपूर्ण शस्त्र आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणावर भर दिला जात आहे. जिल्ह्यातील १२५ हून अधिक केंद्रांवरून लसीकरण मोहीम सुरू आहे. यांतर्गत आतापर्यंत एकूण ८७८६८३ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. आतापर्यंत ६८ टक्के लसीकरण झाले आहे.
...................
थोडेही दुर्लक्ष देऊ शकते कोरोना निमंत्रण
सध्या सणासुदीचे दिवस असल्याने बाजारपेठेत व सार्वजनिक ठिकाणीसुद्धा गर्दी होऊ लागली आहे. अति उत्साहाच्या भरात नागरिकांकडून कोरोना प्रतिबंधात्मक नियमांकडे पुन्हा थोडे दुर्लक्ष होत आहे. मात्र, कोरोनाचा धोका अद्यापही पूर्णपणे टळला नसून नागरिकांना पूर्वीइतकीच काळजी घेण्याची गरज आहे. आपले थोडेही दुर्लक्ष कोरोनाला निमंत्रण देणारे ठरू शकते.
- गोपालदास अग्रवाल, माजी आमदार
..................
नियमांचे करा पालन
कोरोनाचा धोका अद्यापही पूर्णपणे टळलेला नाही. त्यातच सध्या सणासुदीचे दिवस असल्याने नागरिकांकडून नियमांचे पालन करण्याकडे थोडे दुर्लक्ष होत आहे. मात्र, नियमांकडे दुर्लक्ष न करता मास्क, सॅनिटायझरचा नियमित वापर करावा, गर्दीच्या ठिकाणी जाणे शक्यतो टाळावे, नियमांचे काटेकोरपणे पालन करा.
- गंगाधर परशुरामकर, माजी जि.प. सदस्य.
...........
लस घ्या अन् सुरक्षितता बाळगा
कोरोनाविरुद्धच्या लढ्यात प्रतिबंधात्मक लसीकरण हे महत्त्वपूर्ण शस्त्र आहे. त्यामुळे १८ वर्षांवरील सर्वांनी लसीचे दोन्ही डोस अवश्य घ्यावे, तसेच कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करून कोरोनाला पूर्णपणे हद्दपार करण्यास मदत करावी.
- रत्नदीप दहीवले, जिल्हा कार्याध्यक्ष, काँग्रेस
................