सहा मुलांना आणले शिक्षणाच्या प्रवाहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 09:33 PM2019-08-25T21:33:02+5:302019-08-25T21:33:51+5:30
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून शाळांना शाळाबाह्य मुलांची माहिती मागीतली तेव्हा ती यादी शून्य दाखविली जाते. परंतु वास्तविकता वेगळी असण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून शाळाबाह्य मूल शोध मोहीम राबविली जात आहे. यामुळे कधीच शाळेत दाखल न झालेल्या शाळाबाह्य मुलांना शोधण्याचा उपक्रम जिल्ह्यात सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : भीक मागून पोट भरणाऱ्या व बालमजुरी करणाऱ्या बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचे भविष्य उज्वल करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहे. त्यांतर्गत एकही बालक शिक्षणापासून वंचीत राहू नये यासाठी शाळाबाह्य मुलांना शोधण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार, अर्जुनी-मोरगाव व गोंदिया या दोन तालुक्यांत सहा शाळाबाह्य मुलांना शोधून त्यांना शाळेत दाखल कण्यात आले आहे.
एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये व त्या मुलांना गुणवत्तायुक्त शिक्षण मिळावे यासाठी शासनाने आरटीई कायद्यांतर्गत तजविज केली. तसेच स्थानिक प्राधीकरणातील प्रत्येक पर्यवेक्षीय यंत्रणेची जबाबदारी शाळाबाह्य मुलांना शोधण्याची आहे हे नमूद केले. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून शाळांना शाळाबाह्य मुलांची माहिती मागीतली तेव्हा ती यादी शून्य दाखविली जाते. परंतु वास्तविकता वेगळी असण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून शाळाबाह्य मूल शोध मोहीम राबविली जात आहे.
यामुळे कधीच शाळेत दाखल न झालेल्या शाळाबाह्य मुलांना शोधण्याचा उपक्रम जिल्ह्यात सुरू आहे. जिल्ह्यात शहरा लगतच्या ग्राम कुडवा व रेल्वेस्थानक, तिरोडा तालुक्यातील ग्राम काचेवानी, मुंडीकोटा व सडक-अर्जुनी तालुक्यातील ग्राम सौंदड येथे भीक मागणाऱ्या, मांग-गारुडी, लोहार व फिरणाऱ्या नाथजोगींच्या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यात आले आहे. शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक शाळेच्या दर्शनी भागासमोर ‘शाळाबाह्य मूल दाखवा एक हजार रूपये मिळवा’ असे जनजागृती करणारे फलकही लावले आहे.
शिक्षकांनीच शाळाबाह्य मूल शोधण्यासाठी प्रयत्न केलेत. २१ ऑगस्ट रोजी ग्राम कुडवा येथील मुलांच्या शाळेत चार शाळाबाह्य मुलांना दाखल करण्यात आले. तर २३ ऑगस्ट रोजी भविष्य सांगणाऱ्यांच्या दोन मुलींना अर्जुनी-मोरगाव येथील शिक्षण विभागाच्या चमूने शाळेत घातले. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ग्राम कुंभीटोला येथील शाळेत त्यांना दाखल करण्यात आले असून शिक्षण हमी कार्ड देण्यात आले आहे. केंद्रप्रमुख एम.बी. रतनपुरे व इतरांनी त्यांना दाखल करून घेतले.
जिल्ह्यात शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम सुरू
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ग्राम कुंभीटोला येथील जिल्हा परिषद शाळेत दाखल करण्यात आलेल्या मुलींची नावे करीमा ज्ञानेश्वर गुजर व आचल संजय वालके (रा. सेलू, कळमेश्वर, जि. नागपूर) अशी आहे. तर कुडवा येथील शाळेत दाखल करण्यात आलेल्या चार मुलांना शिक्षण हमी कार्ड देण्यात आले. जिल्हाभरात शाळाबाह्य मुलांची शोध मोहीम सुरू आहे.