सहा दिवसांपासून उपचारासाठी महिला ताटकळत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 12:30 AM2018-02-11T00:30:54+5:302018-02-11T00:31:05+5:30
घरात अठराविश्वे दारिद्रय, हातात कवडी नाही. परंतु गर्भाशयाचा कर्करोग झाल्याने ती उपचारासाठी बाई गंगाबाई स्त्री रूगणालयात आली. मात्र सदर महिलेवर मागील सहा दिवसांपासून उपचार करण्यात आला नव्हता.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : घरात अठराविश्वे दारिद्रय, हातात कवडी नाही. परंतु गर्भाशयाचा कर्करोग झाल्याने ती उपचारासाठी बाई गंगाबाई स्त्री रूगणालयात आली. मात्र सदर महिलेवर मागील सहा दिवसांपासून उपचार करण्यात आला नव्हता. यावर उपविभागीय अधिकाºयांनी फटकारताच महिलेवर उपचार सुरू करण्यात आल्याचा प्रकार शनिवारी (दि.१०) उघडकीस आला.
सालेकसा तालुक्यातील ग्राम पानगाव येथील भागरथा बाबुलाल तुमडाम (६०) यांना मुल नाही. परिस्थिती हलाकीची असल्यामुळे त्या खासगी डॉक्टरांकडे उपचार घेऊ शकत नव्हत्या. त्यांना गर्भाशयाचा कर्करोग असल्यामुळे त्या उपचारासाठी ५ फेब्रुवारी रोजी येथील बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात दाखल झाल्या. त्या दाखल झाल्या परंतु त्यांना बेड दिले गेले नाही. त्यामुळे त्यांना इमारतीच्या बाहेरच रहावे लागले. उपचारासाठी दाखल झालेल्या भागरथा यांचा उपचार करणे आवश्यक होते. परंतु येथील डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केला नाही. पाच दिवस लोटूनही त्यांना कोणत्याही डॉक्टरने तपासले नाही. ५ फेब्रुवारी रोजी दाखल झालेल्या भागरथावर उपचार न करता शनिवारी (दि.१०) डॉ. खंडेलवाल यांनी त्यांना येथे उपचार होऊ शकत नाही, तुम्ही नागपूरला जा असा सल्ला देत नागपूरला रेफर केले.
पाच दिवस गंगाबाईत दाखल असलेल्या महिलेला एकाही डॉक्टरने पाहिले नाही. हे त्यांच्या उपचाराच्या कागदावरून स्पष्ट होते. या महिलेला मदत करण्यासाठी गोंदियाच्या उपविभागीय कार्यालयातील एक महिला गेली होती. त्या कार्यालयात नाही कुठे गेल्या याची चौकशी इतर कर्मचाºयांकडून उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांनी केली. तेव्हा त्यांना सदर महिला कर्मचारी महिलेच्या मदतीसाठी गेल्याची माहिती मिळाली. यासंदर्भात पाच दिवस रूग्ण रूग्णालयात असून देखील डॉक्टरांनी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. ही बाब उपविभागीय अधिकारी वालस्कर यांनी जिल्हा शल्य डॉ. देवेंद्र पातुरकर यांच्या लक्षात आणून दिली. परंतु त्यांनी ही बाब वैद्यकीय अधिष्ठाता यांच्या अखत्यारित असल्याचे सांगितले. वालस्कर यांनी ही बाब पुन्हा आ. गोपालदास अग्रवाल यांच्या कानावर टाकली.
आ. अग्रवाल यांनी त्वरीत डॉ.सायास केंद्रे यांना फोन करून त्या महिलेकडे लक्ष देण्यास सांगितले. डॉ. केंद्रे सुट्टीवर असल्याने ते आजच परतत असताना त्यांना या प्रकरणाची माहिती झाली.
ते रूग्णालयात आल्यावर त्या रूग्णाची शोधाशोध केली. परंतु त्या रूग्णाला डॉ. केंदे्र यांच्या येण्यापूर्वीच सुट्टी देण्यात आली होती. त्यामुळे त्या घरी जाण्याच्या बेतात उपविभागीय कार्यालयाच्या रस्त्यावर आल्या. याच उपविभागीय कार्यालयातील एक महिला कर्मचारी त्या रूग्ण महिलेच्या नात्यात असल्याने जातांना त्यांना भेटण्यासाठी त्या रूग्ण या ठिकाणी आल्या होत्या. परंतु उपविभागीय अधिकारी वालस्कर यांच्या प्रयत्नाने डॉ. केंदे्र यांनी महिलेला पुन्हा गंगाबाईत दाखल करून तिच्यावर उपचार सुरू केले.