दप्तरदिरंगाईने सहा गावातील शेतकरी अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 10:42 PM2017-12-11T22:42:20+5:302017-12-11T22:43:15+5:30
शेत जमिनीचे भूमिधारी वर्ग क्रमांक २ मधून भूमिस्वामी वर्ग १ मध्ये परार्वतित करण्यासाठी सडक-अर्जुनी तालुक्यातील सहा गावांतील हजारो शेतकºयांची मागील चार वर्षांपासून धडपड सुरू आहे.
आॅनलाईन लोकमत
गोंदिया : शेत जमिनीचे भूमिधारी वर्ग क्रमांक २ मधून भूमिस्वामी वर्ग १ मध्ये परार्वतित करण्यासाठी सडक-अर्जुनी तालुक्यातील सहा गावांतील हजारो शेतकऱ्यांची मागील चार वर्षांपासून धडपड सुरू आहे. मात्र त्यांच्या अडचणीची लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने दखल घेतलेली नाही. परिणामीे शेतकरी अडचणीत आले आहेत.
शेतीची विक्री आणि बँकेतून कर्जाची उचल करण्यासाठी शेत जमिनीचे भूमिधारी वर्ग क्रमांक २ मधून भूमिस्वामी १ मध्ये रुपांतर करणे गरजेचे आहे. त्याशिवाय ही सर्व कामे करता येत नाही. एखाद्या शेतकºयाला मुलीच्या लग्नाकरिता शेतीची विक्री किंवा बँकेकडे शेती गहाण ठेवून कर्जाची उचल करता येत नसल्याने या शेतकºयांसमोर बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. सडक-अर्जुनी तालुक्यातील चिखली, पिपरी, कनेरी, मनेरी, कोकणा जमिदारी, चिंगी या गावातील शेतकरी मागील तीन चार वर्षांपासून शेत जमिनीचे भूमिधारी वर्ग क्रमांक २ मधून भूमिस्वामी वर्ग १ मध्ये परार्वतित करण्यासाठी भूमिअभिलेख आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायºया झिजवित आहेत. मात्र त्यांची समस्या मार्गी लागली नाही. जेव्हा शेतकरी ही समस्या घेवून भूमिअभिलेख कार्यालयात जातात तेव्हा त्यांना उपस्थित अधिकारी अभिलेख जीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र देऊन परत पाठवितात.
हाच प्रकार गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे. अभिलेख जीर्ण झाले असेल तर ते नवीन तयार करुन देण्याची तरतूद कायद्यात आहे. शासनाच्या २ जानेवारी २०१२ च्या परिपत्रकानुसार सदर काम गावनिहाय करुन दर शनिवारी त्याची यादी प्रकाशीत करण्याचे निर्देश दिले आहे. शेत जमिनीचे भूमिधारी वर्ग क्रमांक २ मधून भूमिस्वामी वर्ग १ मध्ये परार्वतित करण्यासाठी शेतकºयांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर त्यांना १० ते १५ दिवसांत कागदपत्रे तयार करुन देण्याचे निर्देश आहेत.
मात्र यानंतरही भूमिअभिलेख आणि महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी शेतकºयांना वेठीस धरुन कागदपत्रे देण्यास टाळटाळ करित आहेत. यामुळे सडक अर्जुनी तालुक्यातील तब्बल सहा गावातील हजारो शेतकरी अडचणित आले आहेत.
या समस्येकडे लोकप्रतिनिधी आणि शासनाचे लक्ष वेधण्याचे अनेकदा प्रयत्न केले. मात्र त्याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही.
शेकडो रजिस्ट्री थांबल्या
शेत जमिनीचे भूमिधारी वर्ग क्रमांक २ मधून भूमिस्वामी वर्ग १ मध्ये परार्वतित करण्याचे काम होत नसल्याने या सहा गावांतील शेती विक्रीच्या शेकडो रजिस्ट्री थांबल्या असल्याची माहिती आहे. शेतीची विक्री अथवा कर्जाची उचल करता येत नसल्याने या गावातील शेतकरी मागील चार वर्षांपासून विविध आर्थिक अडचणींना तोंड देत आहेत.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामात अडथळा
शेत जमिनीचे भूमिस्वामी वर्ग १ मध्ये रुपांतर करण्याची प्रक्रिया शासकीय दप्तर दिंरगाईमुळे रखडली आहे. त्यामुळे शेतकºयांच्या मुलांना विविध शैक्षणिक कामाची कागदपत्रे तयार करण्यास अडचणी येत आहे.