गॅस सिलिंडरच्या वायुगळतीत सहा जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:23 AM2021-07-17T04:23:44+5:302021-07-17T04:23:44+5:30
अर्जुनी मोरगाव : तालुक्यातील ताडगावटोली येथे गुरुवारी (दि.१५) रात्री नीताराम वासुदेव पंधरे यांचे घरी गॅस सिलिंडरची वायुगळती होऊन आग ...
अर्जुनी मोरगाव : तालुक्यातील ताडगावटोली येथे गुरुवारी (दि.१५) रात्री नीताराम वासुदेव पंधरे यांचे घरी गॅस सिलिंडरची वायुगळती होऊन आग लागली. यात कुटुंबातील पाच तर शेजारचा एक असे सहा व्यक्ती गंभीर जखमी झाले. जखमींना प्राथमिक उपचारानंतर भंडाराच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.
प्राप्त माहितीनुसार, पंधरे कुटुंब गुरुवारी रात्री आठ वाजता जेवणाकरिता बसले होते. गॅस सिलिंडरची वायुगळती सुरू होती. घरात वायू पसरला. वायुगळतीमुळे अगरबत्तीने पेट घेतला. बघता-बघता आगीने संपूर्ण घराला आपल्या कवेत घेतले. आगीतून बचाव करण्यासाठी कुटुंबातील पाच व्यक्ती घराबाहेर निघण्याच्या प्रयत्नात होत्या, तरीही यात सहा जण भाजले. जखमीमध्ये भागरथा वासुदेव पंधरे (६५), नीताराम वासुदेव पंधरे (४६), प्रकाश वासुदेव पंधरे (४३), प्रभू वासुदेव पंधरे (३८), रसिका प्रकाश पंधरे (३५) यांचा समावेश आहे. शेजारील कवडू महागु बनारसे (६०) वर्ष यांनी हा प्रकार बघितला. ते दृश्य बघून बनारसे यांनी स्वयंपाक खोलीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. दरवाजा उघडताच आगीचा भडका त्यांच्या अंगावर आला आणि ते गंभीररीत्या भाजून जखमी झाले. शेजाऱ्यांनी जखमींना अर्जुनी मोरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचार करून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जखमींना भंडारा येथील शासकीय रुग्णालयात हलविले. जखमींची प्रकृती नाजूक असल्याची माहिती आहे. गॅस गळतीच्या आगीमुळे साहित्यासह घराचे दोन लाखांवर नुकसान झाल्याचे वृत्त आहे. पीडितांची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे शासकीय मदत मिळावी, अशी मागणी करण्यात येत आहे.