खेळातून करिअर घडवत आहेत गोंदियातील सहा खेळाडू

By नरेश रहिले | Published: August 29, 2024 03:31 PM2024-08-29T15:31:32+5:302024-08-29T15:32:07+5:30

राष्ट्रीय स्तरावर मारली मजल : शिष्यवृत्तीसाठीही ठरले पात्र

Six players from Gondia are making a career out of sports | खेळातून करिअर घडवत आहेत गोंदियातील सहा खेळाडू

Six players from Gondia are making a career out of sports

नरेश रहिले 
लोकमत न्यूज नेटवर्क 
गोंदिया :
क्रीडा क्षेत्रातून करिअरच्या संधी मोठ्या प्रमाणात आहेत. क्रीडा क्षेत्रामध्ये फक्त एक उत्कृष्ट खेळाडू. उत्कृष्ट प्रशिक्षक व एखादा शिक्षक एवढ्या मर्यादित करिअरच्या संधी नसून पलीकडे स्पोर्ट या सायकॉलॉजिस्ट, स्पोर्ट्स जर्नलिझम, स्पोर्टस फिजिओथेरपिस्ट, स्पोर्ट मॅनेजमेंट, स्पोर्ट अॅडमिनिस्ट्रेटर, जिम इंस्ट्रक्टर व अॅथलीट मॅनेजर यासह अनेक संधी उपलब्ध आहेत. त्यासाठी आता गोंदियातील तरुण क्रीडा क्षेत्रातून आपले करिअर घडविण्याची तयारी करीत आहेत. यातूनच तब्बल सहा तरुणांनी राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारली आहे.


जागतिकीकरणाच्या युगात उद्योग क्षेत्रासह क्रीडा क्षेत्राने भरारी घेतली आहे. विविध खेळांच्या प्रीमियर लीग सुरू झाल्या असून, आणि प्रायोजक पुढे येऊन प्रचंड पैसा यामध्ये टाकत आहेत. त्यामुळे क्रीडा क्षेत्रात काम करणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे. याप्रमाणे क्रीडा क्षेत्रामध्ये करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. या संधी ओळखून येथील तरुणांनी राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारली आहे. त्यात सहा तरुणांना शासनाच्या क्रीडा विभागाकडून शिष्यवृत्तीदेखील सुरू झाली आहे.


यांना सुरू झाली शिष्यवृत्ती येथील भारतीय ज्ञानपीठ स्कूलमधील परिधी अमोल बिसने हिने १४ वर्षे वयोगटात तलवार- बाजीत सुवर्ण पदक पटकावले आहे. तिला ११ हजार २५० रुपये शिष्यवृत्ती सुरु झाली. येथील लिटिल फ्लॉवर्स कनिष्ठ महाविद्यालयातील छबेली होमेंद्र राऊत हिने १९ वर्षे गटात बेसबॉल स्पर्धेत एक कांस्य पदक पटकावले असून, तिला सहा हजार ७५० रुपये शिष्यवृत्ती सुरू झाली. जि. प. हायस्कूलमधील हर्षल गिरधर रक्षा याने १४ वर्षे वयोगटात तायक्चाँडो स्पर्धेत एक कांस्य पदक मिळविले असून, त्याला सहा हजार ७५० रुपये शिष्यवृत्ती सुरू झाली. आमगाव येथील आदर्श विद्यालयातील सिद्धार्थ ब्रह्मानंद हेमने याने १७ वर्षे वयोगटात वुशू स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर सहभाग दर्शविल्याने त्याला तीन हजार ७५० रुपये शिष्यवृत्ती सुरू झाली. तसेच ग्राम खमारी येथील आर.एस. डोये कनिष्ठ महाविद्यालयातील पौर्णिमा गजानन उईके व लिटिल फ्लॉवर्स इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील लीना नंदकिशोर कोहळे या दोघींनी १९ वर्षे वयोगटात अॅथलेटिक स्पर्धेत सहभाग घेतला असून, त्या तीन हजार ७५० रुपये शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरल्या आहेत.


"आवडीच्या खेळाला करिअर म्हणून बघावे. खेळाडूंना ५ टक्के आरक्षण आहे. ऑलिम्पिकमध्ये यश मिळविणाऱ्यांना थेट नोकरी मिळाली, गोंदियात खेळाडूंना घडविण्याची मोठी संधी आहे. यासाठी पालकांना जागरूक करण्याचे काम सुरू आहे." 
- नंदा खुरपुडे, जिल्हा क्रीडा अधिकारी, गोंदिया


"गोंदियाच्या क्रीडा संकुलात ट्रैक आहे; पण सिंथेटिक ट्रैक नाही. यामु‌ळे सिंथेटिक ट्रैक तयार करण्याची आमची मागणी आहे."
- मयूर बनकर, खेळाडू-गोंदिया


"क्रीडा संकुलात अद्ययावत व अॅडव्हॉन्स जीम व्हायला हवी. जुन्याच जीमचा आधार खेळाडूंना घ्यावा लागतो. याकडे लक्ष देण्याची आमची मागणी आहे."
 - आशिष कुंभलकर, खेळाडू-गोंदिया


"स्पोर्ट्स मॅनेजमेंट क्षेत्रात आपल्याला करिअर करायचे असल्याने लहानपणापासून खेळातच आहे. खेळाच्या विकासासाठी हव्या त्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे."
- क्रिष्णा नागरीकर, खेळाडू-गोंदिया

Web Title: Six players from Gondia are making a career out of sports

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.