दीड महिन्यात सहा गर्भवतींचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2017 12:12 AM2017-06-17T00:12:32+5:302017-06-17T00:12:32+5:30

शासन शून्य माता मृत्यू व बालमृत्यू आणण्यासाठी प्रयत्न करीत असले तरी गोंदिया जिल्ह्यात बाल मृत्यू व माता मृत्यूचे तांडव सुरूच आहे.

Six pregnant women die in one and a half months | दीड महिन्यात सहा गर्भवतींचा मृत्यू

दीड महिन्यात सहा गर्भवतींचा मृत्यू

Next

शेंडा पीएचसी अंतर्गत तीन महिला: रक्ताच्या कमतरतेमुळे दोन गर्भवतींचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शासन शून्य माता मृत्यू व बालमृत्यू आणण्यासाठी प्रयत्न करीत असले तरी गोंदिया जिल्ह्यात बाल मृत्यू व माता मृत्यूचे तांडव सुरूच आहे. फक्त दीड महिन्यात गोंदिया जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सहा गर्भवती मातांचा मृत्यू झाला आहे. सडक-अर्जुनी तालुक्याच्या शेंडा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत तीन मातांचा मृत्यू झाला आहे.
जिल्हा आदिवासी व नक्षलग्रस्त अतिसंवेदनशील आहे. येथील गर्भवती महिलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे मातामृत्यूंची संख्या बळावत चालली आहे. यंदाच्या दीड महिन्याच्या काळात सहा गर्भवतींचा मृत्यू झाला आहे. शून्य माता मृत्यूची संकल्पना हवेतच विरली आहे.
१३ व १६ जून रोजी प्रत्येकी एक अशा दोन गर्भवतींचा मृत्यू झाला आहे. या दोन्ही गर्भवतींचा रक्ताच्या कमतरतेमुळे मृत्यू झाला आहे. सडक-अर्जुनी तालुक्याच्या शेंडा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या राजगुडा येथील वनिता आतिल वैद्य (२४) ही महिला साडे सात महिन्यांची गर्भवती होती. तिला सिकलसेल असताना तिचे १० जून रोजी पाय दुखत असल्याने तिला उपकेंद्रातून बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात आणण्यात आले. तिचे पाय मोठ्या प्रमाणात दुखत असल्यामुळे तिला इंजेक्शन देऊन औषध दिले. ११ जून रोजी दुपारी २ वाजता एबी पॉझीटिव्ह रक्त चढविण्यात आले. १२ जून रोजी त्या महिलेला पुन्हा रक्त चढविण्यासाठी नातेवाईकांनी म्हटल्यावर बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयातील रक्तपेढीत गेले. त्यावेळी रक्तपेढीत एबी पॉझीटीव्ह रक्त नव्हते. यानंतर रक्तासाठी नातेवाईकांनी पुण्याला तक्रार केली. पुण्यावरून या प्रकरणाचा फालोेअप घेतला असता रक्तपेढीत एबी पॉझीटिव्ह रक्त उपलब्ध नसल्याचे लक्षात आले. गंगाबाईच्या अधिकाऱ्यांनी एबी पॉझीटिव्ह रक्तगट असलेल्या दोन व्यक्तींची नावे त्या महिलेच्या नातेवाईकांना दिले. त्यांनी त्या लोकांशी संपर्क साधून एक बॉटल रक्त जमविण्यात आले. सायंकाळी ७.३० वाजता दुसरी रक्ताची बॉटल लावण्यात आली. त्यानंतर बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयाच्या आॅपरेशन थिएटरमध्ये आॅक्सीजन लाऊन उपचार करण्यात आला. त्यावरही प्रकृतीत सुधारणा होत नसल्याचे पाहून तिला गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयातील अतिदक्षता कक्षात हलविण्यात आले. १२ जूनच्या ९.३० वाजता दाखल झालेल्या वनिताचा उपचार रात्री १०.३० वाजतापर्यंत करण्यात आला. त्यानंतरही परिस्थिती आटोक्यात न आल्याने वनिताला नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात हलविले. १३ जूनच्या दुपारी १ वाजता उपचार घेताना तिचा मृत्यू झाला. वनिताला सिकलसेल असून तिला वेळेवर रक्त पुरवठा न झाल्याने तिचा मृत्यू झाला. देवरी तालुक्याच्या धोबीसराड येथील माया संजय पटले (२२) या गर्भवतीचा शुक्रवारच्या (दि.१६) पहाटे ४.०५ वाजता मृत्यू झाला. ती नऊ महिन्यांची गर्भवती होती. साकोली येथील डॉक्टर लंजे यांच्याकडे त्या उपचार घेत होत्या. गुरूवारी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी देवरीच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी शुक्रवारी (दि.१६) पहाटे ४ वाजता बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात आणण्यात आले. मात्र उपचार करण्याच्या पूर्वीच त्या महिलेचा पहाटे ४.०५ वाजता मृत्यू झाला. गंगाबाईत आणल्यावर दाखल करण्याची प्रक्रिया होण्यापूर्वी त्या महिलेचा मृत्यू झाला. मायाला रक्तक्षय होता. तिला साकोलीच्या डॉ. लंजे यांच्याकडे रक्त वाढविण्याचे दोन वेळा इंजेक्शन लावण्यात आले होते. रक्त वाढिवण्यासाठी देवरी ग्रामीण रूग्णालयातही दोनवेळा सलाईन लावण्यात आले होते. कमी रक्तामुळे मायालाही प्राणास मुकावे लागले.

गंगाबाई रूग्णालयात आलेल्या रूग्णांवर उपचार केला जातो. ग्रामीण भागात माता संगोपनाचे कार्य देखाव्यासारखेच केले जाते. महिलांची प्रकृती नाजूक झाल्यावरच गंगाबाई रूग्णालयात रेफर केले जात असल्याने त्या रूग्णांचा उपचार करण्याची संधी बहुदा मिळत नाही.
डॉ. संजीव दोडके
वैद्यकीय अधीक्षक, बाई गंगाबाई स्त्री रूग्णालय, गोंदिया

या महिलांचा मृत्यू
ग्रामीण भागातील गर्भवती महिलांकडे सतत होणाऱ्या दुर्लक्षामुळे गर्भवतींचा मृत्यू होत आहे. आरोग्य यंत्रणाही उदासिन असल्यामुळे मातामृत्यूची संख्या वाढत आहे. सडक अर्जुनी तालुक्याच्या शेंडा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या मोहघाटा येथील किरण मुनेश्वर नान्हे या गर्भवतीचा ४ मे रोजी, कवलेवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या सोनेगाव येथील अनिता सुखराम पटले या गर्भवतीचा ५ मे रोजी, शेंडा येथील सुषमा शेंडे या महिलेचा २६ मे रोजी, नवेगाव येथील चंद्रकला बनोटे यांचा १९ मे रोजी, राजगुडा येथील वनिता आतिल वैद्य (२४) यांचा १३ जून रोजी तर माया संजय पटले रा. धोबीसराड यांचा १५ जून रोजी मृत्यू झाला आहे.
संदर्भ चिठ्ठीवर आरोग्य सेविकेची स्वाक्षरी
सडक-अर्जुनी तालुक्याच्या शेंडा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत तीन गर्भवती महिलांचा मृत्यू झाला आहे. उपकेंद्रातील आरोग्य सेविकेने प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांकडे पाठवायला हवे होते. परंतु वनिताच्या संदर्भ चिट्टीवर कोणत्याही वैद्यकीय अधिकाऱ्याची स्वाक्षरी नव्हती तर आरोग्य सेविकेची स्वाक्षरी होती. प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर गर्भवती महिलांची तपासणीही करीत नाही का? असा सवाल वंदनाच्या कागदपत्रावरून निर्माण होते.

 

Web Title: Six pregnant women die in one and a half months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.