वीज पडून सहा महिला मजूर जखमी, गोंदिया जिल्ह्यातील घटना
By अंकुश गुंडावार | Published: July 20, 2023 08:45 PM2023-07-20T20:45:16+5:302023-07-20T20:45:31+5:30
सुदैवाने यात कुठलीही जीवीत हानी झाली नाही
अर्जुनी मोरगाव: शेतात रोवणीचे काम करीत असताना वीज पडल्याने सहा महिला मजूर जखमी झाल्याची घटना तालुक्यातील डोंगरगाव रिटी येथे गुरुवारी (दि.२०) दुपारच्या सुमारास घडली. जखमीपैकी तीन महिला मजुरांना अर्जुनी मोरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करुन सुटी देण्यात आली. तर महिलांवर उपचार सुरु आहे. सुदैवाने यात कुठलीही जीवीत हानी झाली नाही.
तनुजा मोहन दरवडे (३५), शितल प्रशांत सुखदेवे (३४), शिला धनंजय लांडगे (३५), प्रिती सुशील रंगारी, प्रिती नितेश गोंडाणे, सुरजारानी गोंडाणे, सर्व रा. इटखेडा असे वीज पडून जखमी झालेल्या महिला मजुरांचे नाव आहे. तालुक्यातील डोंगरगाव रिटी येथील शेतशिवारात नानाजी उरकुडा लांजेवार यांच्या शेतात गुरुवारी रोवणीचे काम सुरु होते. दुपारच्या सुमारास विजांच्या कडकटासह पावसाला सुरुवात झाली.
दरम्यान शेतात काम करीत असलेल्या महिलांच्या अंगावर वीज कोसळल्याने यात त्या जखमी झाल्या. दरम्यान आजुबाजुच्या शेतकऱ्यांनी लांजेवार यांच्या शेतात धाव घेत जखमी महिलांना अर्जुनी मोरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. जखमीपैकी तीन महिलांना उपचार करुन सुटी देण्यात आली. तर तीन महिलांवर उपचार सुरु आहे. तनुजा दरवडे या अधिक गंभीर जमखी असल्याचे तहसीलदारांनी सांगितले.