मानधनासाठी वृद्धेची सहा वर्षांपासून पायपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 10:07 PM2019-03-20T22:07:47+5:302019-03-20T22:08:56+5:30
निराधारांना आर्थिक आधार देण्यासाठी शासनाच्या वतीने संजय गांधी निराधार योजना सुरू करण्यात आली. मात्र प्रशासकीय दप्तर दिंरगाई व शासनाच्या धोरणामुळे या योजनेपासून लाभार्थ्यांना वंचित राहावे लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवरी : निराधारांना आर्थिक आधार देण्यासाठी शासनाच्या वतीने संजय गांधी निराधार योजना सुरू करण्यात आली. मात्र प्रशासकीय दप्तर दिंरगाई व शासनाच्या धोरणामुळे या योजनेपासून लाभार्थ्यांना वंचित राहावे लागत आहे.
प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील भागी (डवकी) येथील ताराबाई महादेव धरमशहारे या निराधार वृध्द महिलेचे मानधन २०१२ ते २०१८ या वर्षांपासून थकीत आहे. मात्र मागील सहा वर्षांपासून त्यांना या योजनेचे मानधन मिळाले नाही. ते मिळावे यासाठी त्या शासकीय कार्यालयाच्या पायऱ्या झिजवित आहे. मात्र दगडाचे मन असणाऱ्या प्रशासनाला अद्यापही पाझर फुटलेला नाही. निराधार ताराबाई धरमशहारे यांना २०१२ ते २०१९ पर्यंत या योजनेचा लाभ मिळण्यापासून वंचित आहेत. या योजनेतंर्गत मिळणारे मानधन बंद झाल्याने ताराबाईला औषध आणि उदरनिर्वाहाचा खर्च करण्याची अडचण निर्माण झाली आहे.
देवरीचे तहसीलदार विजय बोरुडे यांनी नायब तहसीलदार के. टी. पराते यांना लवकरात लवकर काम करून देण्याचे आदेश दिले. मात्र यानंतरही ताराबाईचे मानधन देण्यात आले नाही. त्यामुळे तहसीलदारांच्या आदेशाला सुध्दा त्यांचे अधिनस्त कर्मचारी जुमानत नसल्याचे चित्र आहे.
देवरी तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी त्यांची समस्या मार्गी लावत नसल्याने ताराबाईनी अखेर गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालय गाठून आपली आपबीती सांगितलीे. त्यांनंतर जिल्हा सहायक अधीक्षक यांनी देवरी तहसील कार्यालयाला पत्र देऊन योग्य कारवाही करुन प्रकरण मार्गी लावण्याचे निर्देश दिले आहे.
सध्या निवडणूक आचारसंहिता असल्यामुळे दुसरी कामे सुरू आहे. ताराबाई धरमशहारे यांचे प्रकरण लवकरच मार्गी लावण्यात येईल.
- के. टी. पराते, नायब तहसीलदार देवरी