स्लॅब कोसळली विद्यार्थी बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 08:43 PM2019-03-26T20:43:20+5:302019-03-26T20:43:58+5:30

तालुक्यातील डवकी येथील जि.प. केंद्रीय वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या इमारतीची स्लॅब कोसळल्याची घटना मंगळवारी सकाळी ११.१५ वाजताच्या सुमारास घडली. सुदैवाने विद्यार्थ्यांना काही झाले नाही. मात्र या प्रकारामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Slab collapsed students | स्लॅब कोसळली विद्यार्थी बचावले

स्लॅब कोसळली विद्यार्थी बचावले

Next
ठळक मुद्देडवकी जि.प. शाळेतील घटना : जीर्ण वर्गखोल्यात विद्यार्थ्यांना धडे

लोकमत न्यूज नेटवर्क
देवरी : तालुक्यातील डवकी येथील जि.प. केंद्रीय वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या इमारतीची स्लॅब कोसळल्याची घटना मंगळवारी सकाळी ११.१५ वाजताच्या सुमारास घडली. सुदैवाने विद्यार्थ्यांना काही झाले नाही. मात्र या प्रकारामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
प्राप्त माहितीनुसार डवकी येथे जि. प. केंद्रीय वरिष्ठ प्राथमिक शाळा असून या शाळेची इमारत जीर्ण झाली आहे. मात्र याच जीर्ण वर्गखोल्यांमध्ये धोका पत्करुन विद्यार्थ्यांना धडे दिले जात आहे. मागील काही दिवसांपासून स्लॅबचे पोपडे पडत असून मंगळवारी स्लॅबचा मोठा भाग कोसळला. सुदैवाने यात विद्यार्थी आणि शिक्षकांना कुठलीच हाणी झाली नाही. मात्र ज्या ठिकाणी स्लॅबचा भाग कोसळला त्या ठिकाणी कुणीच बसले नव्हते अन्यथा मोठी घटना घडली असती. दरम्यान याप्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे.
दरम्यान मुख्याध्यपकांनी याची माहिती पंचायत समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. विशेष म्हणजे शाळेची इमारत जीर्ण झाली असून शाळेच्या इमारतीची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी शालेय व्यवस्थापन समिती आणि शिक्षकांनी जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे केली होती. मात्र त्याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही.
त्यामुळे धोका पत्थकारुन विद्यार्थ्यांना जीर्ण वर्गखोल्यांमध्ये धडे दिले जात आहे. जिल्हा परिषदेच्या जवळपास १३०० वर्गखोल्या जीर्ण झाल्या असून त्यांची त्वरीत दुरूस्ती करण्याची गरज आहे.
यासाठी शाळा व शालेय व्यवस्थापन समित्यांनी अनेकदा जि. प. शिक्षणाधिकाऱ्यांकडे लेखी पाठपुरावा केला. मात्र त्याची अद्यापही दखल घेण्यात आली. सुदैवाने मंगळवारी झालेल्या घटनेत कुठलीही जीवीतहानी झाली नाही. मात्र यामुळे एखाद्या विद्यार्थ्याला इजा झाली असती तर त्याला जबाबदार कोण असा सवाल सुध्दा पालकांकडून केला जात आहे.
शाळेच्या इमारतीची दुरूस्ती त्वरीत करण्याची मागणी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भाष्कर चौधरी, सरपंच उमराव बावणकर यांनी लोकमतशी बोलताना केली.
केंद्र प्रमुखांनी केली पाहणी
डवकी येथील जि.प.केंद्रीय वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या इमारतीचे स्लॅब कोसळल्याची माहिती मुख्याध्यापक व शिक्षकांनी देवरी पंचायत समिती व केंद्रप्रमुखांना दिली. त्यानंतर केंद्रप्रमुख ई.एन.येळणे व एम.के.गेडाम यांनी शाळेला भेट देवून पाहणी केली.
बांधकामावर प्रश्नचिन्ह
या शाळेच्या स्लॅबचे बांधकाम १० ते १२ वर्षांपूर्वी करण्यात आले होते. मात्र अल्पावधीत स्लॅबचे पोपडे पडण्यास सुरूवात झाली असून सलाखी बाहेर दिसत आहे. तर स्लॅबचा काही भाग सुध्दा हळूहळू कोसळत आहे. त्यामुळे या बांधकामात वापरण्यात आलेल्या साहित्यावर सुध्दा प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.
शिक्षण विभागाला केवळ उपक्रमांची काळजी
केवळ डवकी येथीलच नव्हे तर जिल्ह्यातील इतर जि.प.शाळांच्या इमारती जीर्ण झाल्या आहेत. ही बाब वांरवार जि.प.प्राथमिक शिक्षण विभागाच्या निदर्शनास जि.प.सदस्यांनी सुध्दा आणून दिली. मात्र शिक्षणाधिकाऱ्यांनी त्याची अद्यापही दखल घेतली. त्यांना केवळ विविध शैक्षणिक उपक्रम राबवून शाबासकीची थाप पाठीवर मिळवून घेण्यातच रस असून विद्यार्थ्यांच्या जीवाची कुठलीच काळजी नसल्याचे दिसून येते.
आतातरी धडा घेणार का?
डवकी येथील शाळेतील घटनेमुळे जि.प.शाळांच्या जीर्ण वर्गखोल्यांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आतातरी जि.प.शिक्षण विभाग व पदाधिकारी याची दखल घेवून जीर्ण वर्ग खोल्यांची दुरूस्ती करण्यासाठी पाऊल उचलणार का असा सवाल विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला आहे.
 

Web Title: Slab collapsed students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.