शेतातील वृक्षांची कत्तल
By admin | Published: January 12, 2016 01:39 AM2016-01-12T01:39:20+5:302016-01-12T01:39:20+5:30
एकेकाळी जिल्ह्यातील दाट आणि प्राणी संपदा असलेल्या विविध प्रकारच्या वृक्षांनी बहरलेली जंगले बहुतांश उजाड झालेली आहेत.
पक्षी होताहेत लुप्त : सिमेंट जंगलांच्या सुशोभीकरणासाठी उपयोग
रावणवाडी : एकेकाळी जिल्ह्यातील दाट आणि प्राणी संपदा असलेल्या विविध प्रकारच्या वृक्षांनी बहरलेली जंगले बहुतांश उजाड झालेली आहेत. शेतकऱ्यांच्या शेतातही मोठ्या प्रमाणात विविध प्रकारची मौल्यवान जातीची झाडे होती. मात्र अस्मानी सुलतानी संकटामुळे सतत होणाऱ्या दुष्काळामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आणि कुटुंबाचा निर्वाह चालवण्यासाठी लाकूड कंत्राटदारांना शेतात असलेली झाडे विकू लागला. स्वत:च्या आर्थिक दारिद्र्याची झळ कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात झाडे कापून विकली. आता सरळ लाकूड कंत्राटदारांना झाडे विकून ती कापली जात आहेत. त्यामुळे एकेकाळी हिरवीगार दिसणारी शेती आज वृक्षांविना उजाड होताना दिसून येत आहेत.
निसर्गाचा समतोल राखण्यात महत्वाचा घटक असलेली वनसंपदा नष्ट केली जात आहे. वृक्षतोडीचा मानवी जीवनावर जसा परिणाम होत आहे, तसाच परिणाम पशुपक्ष्यांवरही झाला आहे. या मुख्य कारणामुळे निसर्गात मुक्त वावरणाऱ्या पक्ष्यांच्या प्रजाती लुप्त होणाच्या मार्गावर आहेत. तर काही प्रजाती कायमच्या लुप्त होत चालल्या आहेत.
अन्न, निवारा व वस्त्रांसोबत मानवासह प्राणीमात्रांना जगण्यासाठी शुध्द वातावरणाची गरज आहे. शुध्द वातावरण निर्मिती वृक्षांमुळेच होते. शुध्द वातावरण निर्माण करून देणाऱ्या मूळ स्त्रोतावरच मानवाने घाला घातल्याने त्याचा परिणाम मानवासह पशुपक्ष्यांवरही झाला आहे. उरलेसुरले शेतातील वृक्ष स्वार्थासाठी नष्ट केले जात असताना शासनाकडून कोणतीच ठोस उपाययोजना केली जात नाही. काही शेतात अल्पशा प्रमाणात वृक्ष उरले आहेत. त्यांनाही वाचविण्याचे प्रयत्न होत नाही. नव्याने लावलेले वृक्ष त्वरित मोठे होत नाही. जनतेमध्ये नवीन झाडे लावण्याचा अभाव आहे. लावलेली झाडे जगविण्याचाही अभाव आहे. या कारणामुळेच निसर्गाचा समतोल बिघडला यातूनच ग्लोबल वार्मिगची समस्या निर्माण झाली आहे. त्याचा फटका आज अख्या जगाला जाणवत असून मानवासमक्ष विविध गंभीर स्वरूपाच्या समस्या निर्माण झाल्या आहेत.
वातावरणात शुध्द हवा मिळत नसल्यामुळे निसर्गाच्या सौंदर्यात भर पाडण्याऱ्या पक्ष्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. यावर ठोस उपाययोजना करण्यात आली नाही तर येत्या भविष्यकाळात पक्ष्यांच्या जातीचे अस्तित्व नाहिसे झाल्याशिवाय राहणार नाही. मानवी जीवनामध्ये वृक्षांचे अनन्यसाधारण महत्व आहे. त्यातूनच मानवाला इंधन, औषधी, फळ, फूल तसेच जीवनसुद्धा मिळते. हे सर्व बघण्याची जवाबदारी शासनाच्या वनविभागाकडे असते. परंतु वनविभागाच्या दुर्लक्षित धोरणामुळे वरकमाईच्या नादात लाकूड कंत्राददारांवर मेहरनजर राखण्यात येत असल्यामुळे वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल होत आहे. त्यामुळे वृक्ष हाच आधार असलेले पक्षी सहजच लुप्त होत आहेत.
पूर्वी लोकसंख्या फार कमी होती. गावात शेतात मोठमोठी वृक्ष होती. पूर्वी लोक वृक्षपूजन करीत होते. जागोजागी विविध वृक्षांची लागवड होत होती. याच झाडांवर पक्ष्यांचे वास्तव्य असायचे. मात्र सद्यस्थितीत वृक्षांची संख्या कमी होत असून सिमेंट काँक्रिटची जंगले उभी होऊ लागली आहेत. या सिमेंटच्या जंगलाना सुशोभीत करण्यासाठी वृक्षांची मोठ्या प्रमाणात अमानूषपणे कत्तल केली जात आहे. परिणामी पक्ष्यांचे निवारे नष्ट झाले. जगण्यासाठी आवश्यक वातावरण निर्माण होत नसल्यामुळे पक्ष्यांच्या जाती नाहीशा होऊ लागल्या.
एकीकडे वृक्षतोडीमुळे पक्ष्यांच्या संख्येत झपाट्याने घट होत आहे तर दुसरीकडे समाजामध्ये मांसाहाराचे प्रमाण वाढल्यामुळे विविध प्रजातींच्या पक्ष्यांची शिकार केली जात आहे. त्यामुळे पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. विविध सामाजिक संस्था, राजकीय नेते, शासन-प्रशासनामार्फत गाजावाजा करून वृक्षारोपण केले जाते. नंतर त्याकडे कधीच ढुंकूनही पाहण्यात येत नाही. सध्या लाकडी वस्तू न वापरण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. मात्र त्या पर्यांयाना अग्रक्रम न देता आज सर्वत्र फर्निचर मार्ट गलोगल्लीत पहावयास मिळत आहे. शेतातील वृक्षांची कत्तल सर्रास होत असून वाहतूकही राजरोसपणे सुरू आहे. मग वृक्ष कत्तल करून लाकडांची वाहतूक कोणत्या आधारे केली जात आहे. गावोगावात मोकळ्या जागेत हजारो मीटर लाकूड कापून संचित केला जात आहे. त्याचेच दुष्परिणाम आज मानवासह पशु-पक्ष्यांनाही भोगावे लागत आहे. (वार्ताहर)