वर्षभरात सहा हजार वृक्षांची कत्तल

By admin | Published: April 13, 2016 01:55 AM2016-04-13T01:55:18+5:302016-04-13T01:55:18+5:30

वाढत्या ग्लोबल वार्मिंगच्या समस्येमुळे शासनाने पर्यावरण ग्राम संतुलित योजना अंमलात आणली.

Slaughter of six thousand trees annually | वर्षभरात सहा हजार वृक्षांची कत्तल

वर्षभरात सहा हजार वृक्षांची कत्तल

Next

नरेश रहिले गोंदिया
वाढत्या ग्लोबल वार्मिंगच्या समस्येमुळे शासनाने पर्यावरण ग्राम संतुलित योजना अंमलात आणली. त्या माध्यमातून एकीकडे झाडे लावली जात आहेत, तर दुसरीकडे वनातील झाडांची सर्रास कत्तल केली जात आहे. वर्षाकाठी २५ हजारांच्या वर झाडांची अवैधरित्या कत्तल होत आहे. मात्र वनविभागाकडून अधिकृतपणे कत्तल झालेल्या झााडांची संख्या कमी दाखविली आहे. जानेवारी ते डिसेंबर २०१५ या कालावधीत ६ हजारच्या घरात विविध झाडांची कत्तल झाल्याची अधिकृत नोंद वनविभागाने घेतली आहे. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील या अवैध वृक्षकटाईवर कोण आळा घालणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
गोंदिया जिल्ह्यात १२ वनक्षेत्र आहेत. यापैकी देवरी, सडक-अर्जुनी व चिचगड या तीन वनपरिक्षेत्रात सर्वात जास्त अवैध वृक्षतोड करण्यात आली आहे. गोंदिया वनक्षेत्रांतर्गत २९८ झाडांची कत्तल करण्यात आली. तिरोडा ५६८, गोरेगाव ३३९, आमगाव १३४, सालेकसा ४३८, देवरी (उत्तर) ६७०, देवरी (दक्षिण) ४०६, चिचगड ६७७, सडक-अर्जुनी ६८२, नवेगावबांध ६६३, गोठणगाव २५८, अर्जुनी-मोरगाव ५५७ झाडांची कत्तल करण्यात आली. वर्षभरात जिल्ह्यातील ५ हजार ६९० वृक्षांची कत्तल करण्यात आल्याचे वनविभाग सांगते. परंतु मोठ्या प्रमाणात कत्तल झालेल्या वृक्षांची नोंदच वनविभाग घेत नाही.
नागरिकांच्या लक्षात येणाऱ्या झाडांची कत्तल झाल्यास आणि त्याची तक्रार आली तरच चौकशी करून त्याच झाडांची कत्तल झाली असे वनविभाग नोंद करते. परंतु अनेक ठिकाणची झाडे कापल्यानंतरही त्या झाडांची तक्रार वनविभागात नोंदविली जात नाही. त्या वनाची राखन करणारा वनपाल, वनरक्षक ते प्रकरण आपला हलगर्जीपणा दाखवेल असे म्हणून अनेक कत्तल झालेल्या वृक्षांची माहिती वनविभागाला देत नाही.
वनाधिकारी व वनमाफियांच्या संगणमताने वृक्षतोड सुरूच आहे. गोंदिया शहरात येणारा माल पकडण्यासाठी काही वर्षापूर्वी वनविभागाने वनउपज तपासणी नाके तयार केले होते. परंतु अनेक वनउपज तपासणी नाके बंद करण्यात आले. याचाच अर्थ चोरीची लाकडे पकडण्यात येऊ नये यासाठी वनविभागानेच हे वनउपज तपासणी नाके बंद केल्याचे दिसून येते.

१०२३ सागवान झाडांची कत्तल

सागवानाच्या लाकडांची अधिक किंमत असल्याने वर्षभरात जिल्ह्यातील १०२३ सागाच्या झाडांची अवैध कत्तल झाली आहे. त्यातही देवरी व सडक-अर्जुनी तालुका आघाडीवर आहे. गोंदिया वनविभागात ३९, तिरोडा ६८, गोरेगाव ११६, आमगाव ३८, सालेकसा ११५, देवरी (उत्तर) १२७, देवरी (दक्षीण) ४५, चिचगड ४८, सडक-अर्जुनी १६०, नवेगावबांध ११२, गोठणगाव ३४, अर्जुनी-मोरगाव १२१ सागवानाच्या झाडांची कत्तल करण्यात आली. त्या झाडांची किंमत १० लाख ४० हजार ५१७ रूपये सांगितली जाते.

दाखल तक्रारीचे प्रमाण ५० टक्के

जंगलातील लाकडे चोरीला गेल्याची तक्रार वनविभागाकडे केली तरी चोरट्यांकडून तो माल हस्तगत करण्याचे धाडस वनाधिकारी करीत नसल्याने चोरीला गेलेल्या मालाची जप्ती करण्याचे प्रमाण फक्त ५० टक्के आहे. गोंदिया वनविभागातील ८९ हजार ३२ रूपयांचा माल चोरीला गेल्याची नोंद आहे. मात्र २९.७७ टक्केच वसुली झाली आहे. तिरोडा वनविभागातील एक लाख ५४ हजार १९० रूपयांचा माल चोरीला गेला, तर ३९.२८ टक्के वसुली झाली आहे. गोरेगाव वनविभागातील एक लाख ८४ हजार ५८३ रूपयांचा माल चोरी गेला असताना ५८.१३ टक्के वसुली झाली आहे.
आमगाव वनविभागातील ६२ हजार ४९१ रूपयांचा माल चोरीला गेल्याची नोंद आहे. मात्र १८.८२ टक्के वसुली झाली आहे. सालेकसा वनविभागातील ३ लाख ३० हजार ६७४ रूपयांच्या चोरीच्या मालाची ६५.८९ टक्के वसुली झाली आहे. देवरी (उत्तर) वनविभागातील २ लाख ७२ हजार २६५ रूपयांचा माल चोरीला गेला, मात्र ५७.९४ टक्के वसुली झाली आहे. देवरी (दक्षिण) वनविभागातील एक लाख ६५ हजार १०८ रूपयांचा माल चोरी गेला असताना केवळ ४२.१८ टक्के वसुली झाली आहे. चिचगड वनविभागातील २ लाख ३१ हजार ३२० रूपयांच्या मालाच्या चोरीपैकी ६०.८९ टक्के मालाची वसुली झाली आहे.
सडक-अर्जुनी वनविभागातील ३ लाख ५४ हजार २५८ रूपयांचा मालापैकी ३८.८७ टक्के वसुली झाली आहे. नवेगावबांध वनविभागातील दोन लाख २ हजार ९०७ रूपयांचा मालापैकी ६०.४४ टक्के वसुली झाली आहे. गोठणगाव वनविभागातील एक लाख ७२ हजार ९०६ रूपयांचा माल चोरीला गेला, तिथे ४६.५५ टक्के वसुली झाली आहे. अर्जुनी-मोरगाव वनविभागातील एक लाख ५५ हजार ५४८ रूपयांचा माल चोरी गेला असताना केवळ २८.४९ टक्के वसुली झाली आहे. जिल्ह्यातील वनविभागाचे वसुलीचे प्रमाण ४९.५७ टक्के आहे.

Web Title: Slaughter of six thousand trees annually

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.