पोटाच्या भारावर झोपण्याच्या पद्धतीने वाढते शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:30 AM2021-05-07T04:30:47+5:302021-05-07T04:30:47+5:30
गोंदिया : सध्या सर्वत्र कोरोनाने कहर केला आहे. त्यामुळे मानवाला विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी ...
गोंदिया : सध्या सर्वत्र कोरोनाने कहर केला आहे. त्यामुळे मानवाला विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी आणि संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी सजग राहून काळजी घेण्याची गरज आहे. मानवी आरोग्याच्या दृष्टीने शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण योग्य प्रमाणात ठेवणे हे सर्वांत मोठे आव्हान ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर फिजिओथेरपिस्ट तथा वैद्यकीय तज्ज्ञांनी रुग्णाला त्वरित दिलासा मिळू शकतो, असा उपाय सुचविला आहे. पोटाच्या भारावर झोपण्याच्या पद्धतीने शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढते, असा सल्ला दिला आहे.
काळानुरूप सवयी बदलल्या. नैसर्गिक पद्धतीने जीवनशैली जगावी तरच मानवी शरीरही आपल्याला साथ देते. नैसर्गिक पद्धतीनेच शरीरातील व रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कसे समतुल्य राहावे, याचा प्रयत्न केला पाहिजे. पोटाच्या भारावर कोविड रुग्णाला झोपविल्यास त्याचा त्याला तत्काळ फायदा होऊ शकतो. सरळ झोपल्यावर शरीरात ६० ते ६५ टक्के ऑक्सिजन मिळतो; परंतु त्याच कोविड रुग्णाला पालथे झोपायला लावल्यास ९५ टक्क्यांपर्यंत ऑक्सिजन लेव्हलची मात्रा येऊ शकते. पोटाखाली उशी घेतल्यानंतर आपण किती वेळ तसं राहू शकतो याची कल्पनाही रुग्णाला मिळते, त्यानुसार तो अधिक सोयीने ही पद्धत अवलंबू शकतो. घरच्या घरी होम आयसोलेशनमधील रुग्ण हे अधिक सोयीस्करपणे करू शकतात.
.......
असे वाढवा रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण
रुग्णाला झोपताना त्याच्या पोटाखाली एक उशी ठेवावी श्वासोच्छ्वास करताना श्वसन प्रक्रिया सामान्यपणे ठेवावी. तीस मिनिटे ते दोन तास पूर्णतः पोटाच्या वर तर तेवढ्यात कालावधी उजव्या बाजूवर झोपावे, असे करताना आपले डोकं खालच्या बाजूला असेल याची काळजी घ्यावी. रुग्णाच्या सोयीनुसार अशी प्रक्रिया वारंवार करावयास लावावी. काेरोनाबाधित पेशंटला १२ ते १५ तास पालथे झोपणे गरजेचे आहे तरच रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण झपाट्याने वाढू शकते.
.....
पालथे झोपण्याचे फायदे
कोविड रुग्णाने पालथे झोपणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण योग्य प्रमाणात राहते. असे केल्यास ऑक्सिजनचे प्रमाण कमी असलेल्या रुग्णाचे शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढत असते. भरती असलेल्या किंवा गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांचे ऑक्सिजनचे प्रमाणही वाढू शकते. ही प्रक्रिया सामान्यपणे व कुठलाही मानसिक तणाव न ठेवता करावी. फिजिओथेरपी करताना अशी पद्धती वापरली जाते. या पद्धतीचा कुठलाही साइडइफेक्ट होत नाही.
- डॉ. सुमित शर्मा, फिजिओथेरपिस्ट,
....
डॉक्टरांवर विश्वास ठेवा
रुग्णाला पोटाच्या भारावर झोपण्यासाठी आधीच प्रवृत्त केले पाहिजे. या पद्धतीने रुग्णाला लवकरच फायदा होऊन ऑक्सिजनचे प्रमाण सुधारण्यास मदत होते, ही झटपट बाब प्रत्येकालाच सांगितली पाहिजे. घरी विलगीकरणात असलेल्या रुग्णांसाठी ही बाब तर अधिक सोपी व सहज आहे. डॉक्टरांवर विश्वास, नियमित औषधोपचार सुरू ठेवल्यास रुग्ण लवकरच बरा होतो.
- डॉ. विकास जैन, अध्यक्ष, आयएमए, गोंदिया
.....
रुग्णांना संजीवनी मिळण्यास मदत
कोविड रुग्णाला पालथे झोपायला सांगितल्यास त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. लहान बालके बहुतांश पोटाच्या भारावर झोपत असतात. पालथे झोपू नको, असे बजावतही असतो. मात्र पोटाखाली उशी ठेवून झाेपल्यास शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण योग्य राहते, असा निष्कर्षही आता काढण्यात आलेला आहे. कोविड रुग्णांसाठी ही पद्धत संजीवनीच आहे.
- डॉ. प्रदीप गुज्जर, बालरोग तज्ज्ञ, गोंदिया