वयाच्या सत्तरीत अधिक ‘स्मार्ट’ होत आहे ‘लालपरी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 12:40 AM2018-06-02T00:40:37+5:302018-06-02T00:40:37+5:30

तिला कुणी एसटी म्हणतं, कुणी लालपरी म्हणतं तर कुणी लाल डब्बा म्हणतं... कुणाच्या ती प्राणाहून प्रिय आहे, तर कुणी तिचा तिरस्कारही करतात. मात्र ती महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे, हे ही तितकेच निर्विवाद सत्य. महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात लोकांना ने-आण करणाऱ्या एसटीने आज वयाची ७० वर्षे यशस्वीपणे पूर्ण केली.

'Smart' is becoming more 'smart' in the seventeenth century | वयाच्या सत्तरीत अधिक ‘स्मार्ट’ होत आहे ‘लालपरी’

वयाच्या सत्तरीत अधिक ‘स्मार्ट’ होत आहे ‘लालपरी’

googlenewsNext
ठळक मुद्देलाकडी कवच ते स्लीपर कोच, लांबचा पल्ला : प्रवासी सुविधांसाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर

लोकमत न्यूज नेटवर्क
वडेगाव : तिला कुणी एसटी म्हणतं, कुणी लालपरी म्हणतं तर कुणी लाल डब्बा म्हणतं... कुणाच्या ती प्राणाहून प्रिय आहे, तर कुणी तिचा तिरस्कारही करतात. मात्र ती महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे, हे ही तितकेच निर्विवाद सत्य. महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात लोकांना ने-आण करणाऱ्या एसटीने आज वयाची ७० वर्षे यशस्वीपणे पूर्ण केली.
महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात आजही लोक एसटीची वाट पाहून थांबलेली दिसतात. कारण त्यांना वाहतुकीसाठी एसटीचाच आधार आहे. एसटीचा प्रवास-सुखकर प्रवास, ‘बहुजन हिताय-बहुजन सुखाय’ अशा नारा देणाऱ्या एसटीच्या स्थापनेला आज सत्तर वर्षे पूर्ण झाली. १ जून १९४८ रोजी स्थापन झालेल्या एसटी महामंडळाचे त्यावेळी नाव बॉम्बे स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन असे होते. त्यावेळी मुंबई, गुजरात व महाराष्ट्र मिळून बॉम्बे स्टेट होते. राज्यात पहिली एसटी बस अहमदनगर ते पुणे दरम्यान धावली. पहिल्या एसटी चालकाचा मान किसन राऊत तर वाहकाचा बहुमान लक्ष्मण कोवटे यांना मिळाला आहे.
आज दिमाखात रस्त्यावर धावणाऱ्या एसटी बसचे स्वरुप पहिल्यांदा वेगळेच होते. पहिली एसटी बसची बॉडी लोखंडी किंवा अ‍ॅल्युमिनीयमची नसून लाकडाची होती. तर छत कापडाचे होते. आसन क्षमता ३० असलेल्या एसटीचे पहिले तिकीट फक्त अडीच रुपये होते. १९४८ पासून संथगतीने सुरु झालेल्या एसटीचा प्रवास आता मात्र अगदी भरधाव वेगाने सुरु आहे. काळानुरुप अद्ययावत झालेल्या एसटीने वेळेनुसार आपली अनेक रुपे बदलली आहेत. भौतिक सुविधेबरोबरच नवनवीन तंत्रज्ञानाच्या वापराने एसटी अलीकडे अधिक ‘स्मार्ट’ होत आहे.
कागद फाडून तिकीट काढणाऱ्या वाहकांऐवजी संगणकीकृत मशीनद्वारे प्रवाशांना तिकीट दिले जात आहेत. एसटी प्रवास अधिक मनोरंजक होण्यासाठी बसमध्ये मोफत ‘वायफाय’ सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. प्रवाशांना सामानाची सुरक्षीतात मिळावी म्हणून खासगी कंपनीच्या सहकार्याने सुरक्षारक्षक व पार्सल नेण्याची सुविधा उपलब्ध आहे. बसस्थानकावर प्रवासी मनोरंजनासाठी टीव्ही व स्वच्छतेसाठी खासगी कंपनीच्या सहकार्याने सेवा पुरविली जात आहे. एसटी प्रवास अधिक गतीने होण्यासाठी एसटी द्वारे ई-टोल टॅक्स पद्धतीचा अवलंब केला जात आहे. त्यामुळे रस्त्यावरील टोल नाक्यांवर टोल भरण्याच्या वेळखाऊ कटकटीपासून प्रवाशांची मुक्तता झाली आहे. एवढेच नव्हे तर विद्यार्थी व नागरिकांना पास नुतनीकरणासाठी असता रोख रकमेची गरज नसून स्वाईप मशीनद्वारे एटीएमकार्ड स्वाईप करुन पास नूुतनीकरण करता येते. सीट आरक्षीत करण्याकरिता बसस्थानकावर न जाता आॅनलाईन सीट आरक्षीत करता येते.
लाकडी बॉडीपासून धावत असलेल्या एसटीने आधी लोखंडी, मग अ‍ॅल्युमिनीयम व आता फेबु्रवारी २०१८ पासून स्टीलचे शरीर धारण केले आहे. प्रवासाची गती व दर्जा यानुसार एसटीचे अंतरंग, बाह्यरंगही तितक्याच झपाट्याने बदलत आहे. मिडी, यशवंती, हिरकणी, परिवर्तन बस, निमआराम, साधी बस, जलद बस, शिवनेरी, शितल, अश्वमेध अशी विविध नावे घेऊन धावणाºया एसटीने आता तर शिवशाही व शिवशाही स्लीपर कोचद्वारे परिवर्तनाच्या क्षेत्रात धमाल क्रांती घडविली आहे.
एसटी तंत्रज्ञान, भौतिक सुविधा यासोबतच प्रवाशांच्या सेवेसाठी विविध योजना पण राबविल्या जात आहेत. बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेअंतर्गत १० लाख रुपये मदत, रा.प. कर्मचाऱ्यास १ लाख मृत्यू मदत निधी, डिजीटल इंडिया धोरणांतर्गत सर्व बसस्थानकावर कॅशलेस पास वितरण केंद्र, याशिवाय ज्येष्ठ नागरिक, पोलीस, अपंग, विद्यार्थी इत्यादींना विविध सवलती दिल्या जात आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रात ३१ विभागात विभागलेल्या एसटीचे २४८ आगार असून राज्यभर सुमारे २० हजारांहून अधिक बसेस प्रवाशांच्या सेवेत आहेत. तर भंडारा विभागातील आगारात सुमारे ४३२ बस प्रवासी सेवेत आहेत.
आता ज्येष्ठ नागरिकांनाही शिवशाहीत सवलत
१ जून २०१८ रोजी एसटीच्या प्रवासाला ७० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आजपासून ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या शिवशाही बसमध्ये सवलत देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. शिवशाही सीटर मध्ये ज्येष्ठ नागरिकांना ४५ टक्के सवलत तर शिवशाही स्लीपरमध्ये ३० टक्के सवलत देण्यात आली आहे. भंडारा विभागात धावत असलेल्या १८ शिवशाही बसचा लाभ ज्येष्ठ नागरिकांना सवलती दरात घेता येणार आहे.

Web Title: 'Smart' is becoming more 'smart' in the seventeenth century

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.