वंचितांच्या चेहऱ्यावर फुलविले हास्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2019 06:00 AM2019-11-05T06:00:00+5:302019-11-05T06:00:23+5:30
दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे धनतेरस. धनतेरसच्या दिवशी सौंदड येथील सामाजिक कार्यकर्ता प्राध्यापक अनिल मेश्राम, अमरचंद ठवरे, आरती चवारे, विश्वजीत बागडे, हिमेश्वरी कावडे यासर्वांनी मिळून मुलांना गोडधोड आणि मिठाई भेट म्हणून दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : दिवाळी सण म्हणजे इथल्या सणांमधला राजा. दिव्यांची आरास शहर व गावापासून गल्लीपर्यंत आणि झोपडपट्टीतही मांडली जाते. पण प्रत्येकाच्याच वाट्याला हा आनंदाचा सोहळा प्रकाशाचे पर्व येईल असं नाही. गोंदियापासून अगदी हाकेच्या अंतरावर मांगगारूडी समाजाची वस्ती जी अण्णाभाऊ साठे नगर या नावाने ओळखली जाते. या वस्तीतील लोकांच्या सर्वांगीण उत्थानासाठीसाठी येथील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी जीव पणाला लावला आहे. ज्या वस्तीसाठी ते रात्रंदिवस झटत असतात ते मुख्य प्रवाहात यावेत म्हणून धडपडत असतात. ती वस्ती या आनंदापासून सुखापासून वंचित राहिल म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून दिवाळीत या वस्तीला भोजनदान दिले जाते.
दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे धनतेरस. धनतेरसच्या दिवशी सौंदड येथील सामाजिक कार्यकर्ता प्राध्यापक अनिल मेश्राम, अमरचंद ठवरे, आरती चवारे, विश्वजीत बागडे, हिमेश्वरी कावडे यासर्वांनी मिळून मुलांना गोडधोड आणि मिठाई भेट म्हणून दिली. दिवाळीचा दुसरा दिवस लक्ष्मीपूजनाचा असून बहेकार व्यसनमुक्ती केंद्राचे विजय बहेकार, विजय ठवरे, वरून खंगार, वशिष्ठ खोब्रागडे जागृत सेलोकर व सविता बेदरकर यांनी मिळून भोजनाचा कार्यक्र म ठेवून पोटभर गोडधोड खाऊ घातले.
दिवाळीचा तिसरा दिवस म्हणजे बळी महोत्सव. या दिवशी शेतकऱ्यांचे राजपाट हिरावले गेले. बळीराजाच्या स्मृतीदिनानिमित्त गोधनाला अभिवादन करून भोजनाचा कार्यक्र म आयोजित करण्यात आला.
यावेळी वस्तीतील विजय पात्रे, सविता विनोद अग्रवाल आणि सविता बेदरकर उपस्थित होत्या. चौथा दिवस म्हणजे भाऊबिजेचा व यादिवशी फराळाचं घेऊन दिव्या भगत यांच्या हस्ते वस्तीतील लोकांना भाऊबीजनिमित्त भेट देण्यात आली. दिवाळीच्या सांगतेसाठी पाचव्या दिवशी प्राध्यापक वैशाली कोहपरे, रेणू डोंगरे, वैशाली खोबरागडे, आरती चवारे, नानन बिसेन, यशोधरा सोनवणे, मनिषा पशीने यांनी आपापल्या घरून भोजन आणून या वस्तीतील आबालवृद्ध आणि लहान बालकांना भोजनदान दिले.
दिवाळी सण म्हणजे आनंदाचा उत्साहाचा पण या आनंदापासून या वस्तीतील लोक वंचित राहू नये त्यांनाही सुग्रास भोजनाचा आणि मिठाईचा आस्वाद घेता यावा म्हणून दिवाळीचे पाचही दिवस भोजनदान देऊन प्रकाशाच्या पर्वाचे पूजन केले गेले. दिवाळीचे पाच दिवस का होईना वंचिताच्या चेहºयावर हास्य फुलविण्याचे काम सामाजिक कार्यकर्त्यांनी केले.
फटाके देण्याचे टाळले
विविध पक्वानांची मेजवानी देत असतानाच मात्र सामाजिक कार्यकर्त्यांनी फटाके देण्याचे कटाक्षाने टाळले. कारण फटाक्यांमुळे लहान पशु आणि पक्ष्यांवर व त्यांच्या आरोग्यावर परिणाम होते. शिवाय वायू प्रदूषण होत असून ज्या गोष्टी पर्यावरणाला हानीकारक आहेत त्यांचा उपयोग टाळण्यासाठी फटाके देण्याचे टाळण्यात आले. या उपक्रमातून स्वत:बरोबर इतरांसाठी कसे जगता येईल याचा धडा या विचाराला जोडलेल्या लोकांनी समाजासमोर ठेवला.