परराज्यातून तस्करी, ३०.७० लाखांचा १६०५ किलो सुगंधित तंबाखू, गुटखा जप्त
By नरेश रहिले | Published: December 29, 2023 06:44 PM2023-12-29T18:44:54+5:302023-12-29T18:45:08+5:30
छत्तीसगड राज्यातील रायपूर येथून गडचिरोली जिल्ह्यातील वडसा येथे जाणारा सुगंधित तंबाखूचा साठा अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पकडला.
गोंदिया: शेजारच्या छत्तीसगड राज्यातील रायपूर येथून गडचिरोली जिल्ह्यातील वडसा येथे जाणारा सुगंधित तंबाखूचा साठा अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पकडला. गुरुवारी (दि.२८) रात्री ९ वाजता नवेगावबांध पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम धाबेपवनी येथे ही कारवाई करण्यात आली. यात तंबाखू व पानमसाला असा एकूण १६०५ किलो वजनाचा तंबाखू व पानमसाला साठा जप्त करण्यात आला.
तंबाखू व प्रतिबंधित पान मसाला रायपूर येथून वाहन क्रमांक एमएच ४०-सीडी ३२३५ मध्ये भरून देवरी मार्गे जंगलातून गडचिरोली जिल्ह्यातील वडसानेला जात होता. गुप्त माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासनाचे अन्नसुरक्षा अधिकारी महेश चहांदे, नमुना सहायक नीलकंठ बारसागडे व नवेगाव पोलिसांनी संयुक्त कारवाई करून या वाहनाला धाबेपवनी येथे पकडले. वाहनाची तपासणी केली असता त्यात सुगंधित तंबाखू व पान मसाला, ईगल मजा १०८ पान मसाला, रजनीगंधा असा १६०५ किलो वजनाचा साठा आढळला. त्या तंबाखूजन्य पदार्थाची किंमत ३० लाख ७० हजार १७० रुपये सांगितली जाते. या साठ्यातून अन्नसुरक्षा अधिकारी चहांदे यांनी नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविले. या प्रकरणातील वाहन चालक ओमप्रकाश देवाजी शिंदे (रा. काटोल रोड, नागपूर) व वाहन मालक अमित भीमराव राऊत (रा. वाॅर्ड क्रमांक-१ काटोल रोड, नागपूर) या दोघांवर नवेगावबांध पोलिस ठाण्यात भादंवि कलम १८८, २७२, २७३, ३२८ सहकलम २६ (२) (आय), ५९ अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.