तो डांबर प्लांट विनापरवानगीनेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 09:49 PM2019-05-15T21:49:31+5:302019-05-15T21:51:04+5:30
सिरेगावबांध या निसर्गरम्य स्थळी उभारण्यात आलेला हॉट मिक्स डांबर प्लांट विनापरवानगीने थाटण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. प्लांट मालकावर महसूल प्रशासनातर्फे काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी मोरगाव : सिरेगावबांध या निसर्गरम्य स्थळी उभारण्यात आलेला हॉट मिक्स डांबर प्लांट विनापरवानगीने थाटण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. प्लांट मालकावर महसूल प्रशासनातर्फे काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
डांबर प्रकल्पामुळे पर्यावरणाला धोका या मथळ्याखाली लोकमतचे ९ मे च्या अंकात वृत्त प्रकाशीत करून हा सर्व प्रकार उघडकीस आणला होता.तसेच यासंदर्भात जि.प.सदस्य किशोर तरोणे यांनी प्रशासनाला तक्रार केली होती.वृत्त प्रकाशित होताच तालुका प्रशासनाने चौकशीची सूत्रे हलविली.तहसीलदार विनोद मेश्राम यांनी १० मे रोजी एक पत्र काढून नायब तहसीलदार एम.यु.गेडाम यांना चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. गेडाम यांनी प्रकल्पाला १४ मे रोजी भेट दिली. गोंदिया येथील प्लांट मालक अनिकेत फत्तुसिंह चव्हाण यांनी सोमलपूर येथील ग्रामपंचायतचे ना हरकत प्रमाणपत्र घेऊन मौजा गंगेझरी गट क्र.१६ आराजी १.१० हे.आर. पैकी ०.३० हे.आर.जागेवर डांबर प्लांट लावले आहे. ही जागा सरकारच्या मालकीची असून येथे झाडांचे जंगल अशी नोंद आहे.असे निदर्शनास आले आहे. यासंदर्भात पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मयुर आंदेलवाड व विस्तार अधिकारी आर.डी.वलथरे यांनीही भेट देऊन चौकशी केली. या परिसरावर निसर्गाने मुक्त उधळण केली असून हे पर्यटन स्थळ आहे.याठिकाणी हिवाळ्यात मोठ्या प्रमाणावर विदेशी पक्ष्यांचा संचार असतो. शिवाय या प्लांटमधील मानवी अधिवासामुळे वन्यप्राण्यांना बांधातील पाणी व मुक्त संचारात अडथडे निर्माण होणार आहे. उष्ण मिश्रीत डांबर प्लांटमुळे हे थंड वातावरण उष्ण होणार असून याची वन्यजीव व पक्ष्यांना हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय पर्यावरण प्रदूषित होण्याची सुद्धा भीती आहे. यासर्व प्रकारामुळे हे प्लांट येथून इतरत्र हटविण्यात यावे यादृष्टीने प्रशासनाचे लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.