...तर आठवडाभरात जिल्हा होईल कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:19 AM2021-06-23T04:19:57+5:302021-06-23T04:19:57+5:30
गोंदिया : मागील दोन आठवड्यांपासून जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट सातत्याने कमी होत आहे. राज्यात जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट सर्वांत कमी असून, ...
गोंदिया : मागील दोन आठवड्यांपासून जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट सातत्याने कमी होत आहे. राज्यात जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट सर्वांत कमी असून, कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ५६वर आली आहे. कोरोना बाधितांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याने ही स्थिती अशीच राहिल्यास आठवडाभरात जिल्हा पूर्णपणे कोरोनामुक्त होण्याची शक्यता आरोग्य विभागाच्या तज्ज्ञांनी वर्तविली आहे. त्यामुळे ही बाब जिल्हावासीयांसाठी निश्चितच आनंदाची आहे.
मंगळवारी (दि. २२) जिल्ह्यात ४ बाधितांनी कोरोनावर मात केली, तर तीन नवीन रुग्णांची नोंद झाली. मागील तीन दिवसांपासून एकाही कोरोना बाधिताचा मृत्यू झालेला नाही. ही निश्चितच समाधानकारक बाब आहे. मागील दोन आठवड्यांपासून कोरोनाचा संसर्ग बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आला आहे. कोरोना चाचण्यांच्या तुलनेत बाधित रुग्णांची संख्या फारच नगण्य आहे. त्यामुळे जिल्ह्यातून कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे ओसरल्याचे चित्र आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत १,८७,९७४ स्वॅब नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १,६२,८१८ नमुने निगेटिव्ह आले. कोरोना बाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. यांतर्गत २,०४,९९० नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी १,८४,०५३ नमुने निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४१,०८९ कोरोना बाधित आढळले असून, त्यापैकी ४०,३३४ जणांनी काेरोनावर मात केली. सद्यस्थितीत ५६ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून, ११९ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.
............
मंगळवारचा पॉझिटिव्हिटी रेट केवळ ०.११ टक्के
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने मंगळवारी एकूण २,७१५ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यात ५५६ नमुन्यांची आरटीपीसीआर, तर २,१६८ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात ३ नमुने कोरोना पाॅझिटिव्ह आढळले. त्याचा पॉझिटिव्हिटी रेट ०.११ टक्के आहे.
.......
लसीकरणाला येतोय वेग
कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण हे महत्वपूर्ण आहे. त्यामुळेच लसीकरणावर भर दिला जात आहे. सध्या जिल्ह्यातील एकूण १४० लसीकरण केंद्रांवरून लसीकरण मोहीम सुरू आहे. या केंद्रावरून आतापर्यंत ३ लाख ६० हजार ५५५ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यात २,७६,७९५ नागरिकांना पहिला डोस, तर ८३,७६० नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला.
............