आतापर्यंत २ लाख १८ हजार नमुने कोरोना निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:30 AM2021-04-27T04:30:20+5:302021-04-27T04:30:20+5:30
गोंदिया : सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढत आहे. त्यामुळे कोरोना चाचण्यांचे प्रमाण सुध्दा वाढविण्यात आले आहे. कोरोना संसर्गाच्या ...
गोंदिया : सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढत आहे. त्यामुळे कोरोना चाचण्यांचे प्रमाण सुध्दा वाढविण्यात आले आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख ६०८४८ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. यापैकी २ लाख १८ हजार ७२९ नमुने निगेटिव्ह आले आहे. तर तब्बल २३ हजार ८३६ बाधितांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. ही जिल्हावासीयांसाठी निश्चितच दिलासादायक बाब आहे.
जिल्ह्यात सोमवारी (दि.२६) ६०३ नवीन रुग्णांची नोंद झाली तर १७ बाधितांचा उपचारादरम्यान खासगी आणि शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. उपचार घेत असलेल्या ५७८ कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सोमवारी आढळलेल्या ६०३ बाधितांमध्ये सर्वाधिक २७१ रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहे. तिरोडा २२, गोरेगाव २९, आमगाव ३४, सालेकसा ६७, देवरी ४० सडक अर्जुनी ९३, अर्जुनी मोरगाव ४५ व बाहेरील २ रुग्णांचा समावेश आहे. मागील काही दिवसांपासून शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागात सुध्दा कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. काही गावच्या गाव बाधित होत असल्याचे चित्र आहे. मात्र नागरिक कोरोना चाचणी करण्यासाठी स्वत:हून पुढे येत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. रुग्ण संख्येत वाढ होत असली तरी कोरोनावर मात करणाऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याने थोडा दिलासा मिळाला आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत १३०७४२ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १०६२०९ नमुने निगेटिव्ह आले आहेत. कोरोना बाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केल्या जात आहे. यांतर्गत १३०१०६ नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ११२५२३ नमुने निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३०८८१ काेरोना बाधित आढळले असून यापैकी २३८३६ जणांनी कोरोनाला हरविले आहे. सद्य:स्थितीत ६५६१ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर ५५५४ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.
.............
अहवाल मिळण्यासाठी नागरिक वेटिंगवर
गोंदिया येथील प्रयोगशाळेत सद्य:स्थितीत ५५५४ स्वॅब नमुने प्रलंबित आहे. प्रलंबित नमुन्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांना वेळीच आरटीपीसीआर रिपोर्ट मिळण्यास विलंब आहे. त्यामुळे आपण पॉझिटिव्ह की निगेटिव्ह याच संभ्रमात कोरोना चाचणी करणारे नागरिक आहेत.
......
मृतकांच्या संख्येत होतेय वाढ
जिल्ह्यात मागील सात दिवसात एकूण १२२ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. सोमवारीसुध्दा १७ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. मृतकांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने थोडी चिंता वाढविली आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोना संसर्गाची लक्षणे दिसता वेळीच रुग्णालयात जाऊन उपचार करून घ्यावा.