आतापर्यंत ३० हजार बाधितांनी केली कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:31 AM2021-05-06T04:31:29+5:302021-05-06T04:31:29+5:30
गोंदिया : जिल्ह्यात हळूहळू कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. मागील पंधरा दिवसांत तब्बल १२ हजार बाधितांनी ...
गोंदिया : जिल्ह्यात हळूहळू कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. मागील पंधरा दिवसांत तब्बल १२ हजार बाधितांनी कोरोनावर मात केली, तर आतापर्यंत एकूण ३०,११८ बाधितांनी कोरोनाला हरविल्याचे दिलासादायक चित्र आहे. त्यामुळे जिल्हावासीयांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन केल्यास जिल्हा लवकरच कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बुधवारी (दि.५) जिल्ह्यात ६४५ बाधितांनी कोरोनावर मात केली, तर ४२२ नवीन रुग्णांची नोंद झाली. ६ रुग्णांचा उपचारादरम्यान शासकीय आणि खासगी रुग्णालयांत मृत्यू झाला. बुधवारी आढळलेल्या ४२२ रुग्णांमध्ये सर्वाधिक १६३ रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहेत. तिरोडा २९, गोरेगाव ४६, आमगाव २२, सालेकसा २१, देवरी ९१, सडक अर्जुनी ३१, अर्जुनी मोरगाव १५ आणि बाहेरील ४ रुग्णांचा समावेश आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत १,३७,२२६ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १,११,८५३ नमुने निगेटिव्ह आले आहेत. कोरोनाबाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजेन टेस्ट केली जात आहे. याअंतर्गत १,३९,७७८ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यापैकी १,२०,१८९ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ३५,३४० कोरोनाबाधित आढळले असून, यापैकी ३०,११८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत ४,६५३ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून, ३,६०७ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.
.........
लसपुरवठ्याअभावी केवळ १४ केंद्रांवर लसीकरण
जिल्ह्यात आतापर्यंत १,६७,७७८ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. मात्र मागील दोन दिवसांपासून लसींचा पुरवठा न झाल्याने याचा लसीकरण मोहिमेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे १४० केंद्रांवरून सुरू असलेली लसीकरणाची मोहीम सध्या केवळ १४ केंद्रांवरुन सुरू आहे.
..........
रुग्णसंख्येत होणारी घट दिलासादायक
कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा मात करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मागील पंधरा ते वीस दिवसांपासून रुग्णसंख्येत सातत्याने घट होत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत असल्याचे दिसून येत आहे.