गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ३५ टक्के पीककर्जाचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 09:39 PM2020-06-10T21:39:46+5:302020-06-10T21:40:41+5:30

यंदा खरीप हंगामाला सुरूवात झाली तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केवळ ३५.२७ टक्के पीक कर्जाचे वाटप आतापर्यंत करण्यात आले आहे. त्यामुळे यंदा पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट कसे पूर्ण होणार याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

So far only 35% crop loan has been disbursed in Gondia district | गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ३५ टक्के पीककर्जाचे वाटप

गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ३५ टक्के पीककर्जाचे वाटप

Next
ठळक मुद्देखरीप हंगामात शेतकऱ्यांची कोंडी राष्ट्रीयकृत बँका पिछाडीवर

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : खरीप हंगामात शेतकऱ्यांना खते, बियाणांची खरेदी आणि शेतीच्या मशागतीची कामे करण्यास अडचण जावू नये, यासाठी शेतकऱ्यांना बँकाच्या माध्यमातून पीक कर्ज उपलब्ध करुन दिले जाते. मात्र यंदा खरीप हंगामाला सुरूवात झाली तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केवळ ३५.२७ टक्के पीक कर्जाचे वाटप आतापर्यंत करण्यात आले आहे. त्यामुळे यंदा पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट कसे पूर्ण होणार याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यात यंदा १ लाख ९९ हजार हेक्टरवर खरिपाची लागवड करण्यात येणार आहे. शेतकरी सध्या खरीप हंगामाच्या कामात व्यस्त आहे. मृग नक्षत्राला सुरूवात झाली असून हवामान विभागाने सुध्दा यंदा दमदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे शेतकरी सुध्दा जोमाने कामाला लागला आहे. खरीप हंगामात पैशाची चणचण भासू नये यासाठी शेतकरी पीक कर्जाची उचल करण्यासाठी बँकेत जात आहे. मात्र राष्ट्रीयकृत बँकांकडून अजूनही शेतकऱ्यांची कागदपत्रांच्या नावावर कोंडी केली जात आहे. त्यामुळे शेतकरी सुध्दा त्रस्त झाला आहे. कोरोनाच्या प्रादुभार्वामुळे लॉकडाऊन असल्याने शेतकºयांचे आधीच कंबरडे मोडले आहे. त्यातच कागदपत्रांच्या नावावर कोंडी केली जात असल्याने शेतकरी त्रस्त असल्याचे चित्र आहे. नाबार्ड आणि शासनाने यंदा जिल्ह्यातील जिल्हा, राष्ट्रीयकृत आणि ग्रामीण बँकांना यंदा खरीप हंगामात २७० कोटी रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. यापैकी आत्तापर्यंत जिल्हा बँकेने ७३ कोटी ७० लाख, राष्ट्रीयकृत बँकांनी ८ कोटी ७६ लाख आणि ग्रामीण बँकांनी १ कोटी २७ लाख रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप केले. आत्तापर्यंत एकूण ९५ कोटी २२ लाख रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप करण्यात आले असून त्याची टक्केवारी ३५.२७ टक्के आहे. यात सर्वाधिक ५६.९५ टक्के पीक कर्जाचे वाटप हे गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने केले आहे. तर राष्ट्रीयकृत बँकांनी केवळ ८.३२ टक्के पीक कर्जाचे वाटप केले असून राष्ट्रीयकृत बँका पीक कर्ज वाटपाबाबत अद्यापही उदासीन असल्याचे चित्र आहे.

पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट गाठणे कठीणच
जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत, ग्रामीण आणि जिल्हा बँकेला यंदा २७० कोटी रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मात्र जून महिन्याला सुरूवात झाली असताना सर्व बँकांनी केवळ ३५ टक्के पीक कर्जाचे वाटप केले असल्याने उर्वरित ६५ टक्के उद्दिष्ट बँका पुढील दोन महिन्यात कसे गाठणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे यंदाही पीक कर्जाचे उद्दिष्ट पूर्ण होणे कठीण असल्याचे चित्र आहे.

 

 

 

Web Title: So far only 35% crop loan has been disbursed in Gondia district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी